पांढरकवडा तालुक्यात लाखोंनी गंडा घालणारे भामटे

By admin | Published: May 31, 2014 11:47 PM2014-05-31T23:47:05+5:302014-05-31T23:47:05+5:30

नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून बेरोजगारांना लाखो रुपयांचा गंडा घालणारे भामटे तालुक्यात सक्रिय झाले आहेत. आतापर्यंत अनेक सुशिक्षित बेरोजगारांना या भामट्यांनी लाखो रुपयांनी गंडविले आहे.

Bhamte, who lent millions of money in Pandharkawada taluka | पांढरकवडा तालुक्यात लाखोंनी गंडा घालणारे भामटे

पांढरकवडा तालुक्यात लाखोंनी गंडा घालणारे भामटे

Next

नरेश मानकर - पांढरकवडा
नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून बेरोजगारांना लाखो रुपयांचा गंडा घालणारे भामटे तालुक्यात सक्रिय झाले आहेत. आतापर्यंत अनेक सुशिक्षित बेरोजगारांना या भामट्यांनी लाखो रुपयांनी गंडविले आहे.
बेकारीचा भस्मासूर दिवसेंदिवस वाढत आहे. बेरोजगारांना नोकर्‍या मिळणे दिवसेंदिवस कठीण होत आहे. नोकरी मिळविण्यसाठी सुशिक्षित बेरोजगार व त्यांचे पालक कितीही पैसे मोजायला तयार असतात. याचाच फायदा लाटणारे अनेक जण सध्या तालुक्यात सक्रिय झाले आहे. नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगारांना लाखो रुपयांनी लुटणार्‍या या लुटारुंमध्ये काही राजकीय व्यक्तींचाही समावेश आहे.
सध्या अशा बेरोजगार युवकांना हेरुन त्यांना गंडविणारी भामट्यांची टोळीच तालुक्यात सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. यात अनेक संधीसाधूंनी रोजगाराचा बाजारच मांडल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे या भामट्यांचे दलाल ठिकठिकाणी जाऊन सुशिक्षित बेरोजगारांना हेरतात. काही भामटे तर शहरातील एखादा भामटा पकडून त्याच्याकडून बेरोजगारांची माहिती मिळवितात. त्याला विशिष्ट ठिकाणी घेऊन जातात. त्याला नोकरीचे आमिष दाखऊन त्याच्याकडून लाखो रुपये उकळतात. हे भामटे त्या सुशिक्षित बेरोजगारावर अशाप्रकारे छाप टाकतात, की तो भामट्याला पैसे देण्यास बळी पडतोच. घरचे दागदागिने विकून, कर्ज काढून त्या भामट्यांना पैसे दिले जाते. पैसे देताना आपण फसविले जात आहो, याची बेरोजगारांना साधी कल्पनाही नसते.
शहराबरोबरच ग्रामीण भागातील बेरोजगार युवकांचीही नोकरीसाठी भटकंती होत आहे. अनेक अडचणींवर मात करीत विद्यार्थी पदवीधर होतात. पदवीनंतर नोकरी मिळविण्यासाठी तरुणांचा संघर्ष सुरु होतो. पदवी कोणतीही असो, नोकरी कोणत्याही क्षेत्रातील असो, अर्जदार हजारावर असतात. ही स्थिती सर्वत्र दिसत आहे. तालुक्यात याचे प्रमाण अधिकच आहे. नोकरी नसल्याचे शल्य उराशी बाळगून सुशिक्षित तरुण नोकरीसाठी फिरताना दिसतात. यातून नैराश्य येऊन अनेकांनी पर्यायी मार्ग स्विकारण्याची तयारी दर्शविली आहे. याचाच फायदा दलाल घेत आहे. त्यामुळे नोकरीचे भावही वधारले आहेत.
सुशिक्षित बेरोजगारांच्या मानसिकतेचा फायदा घेत संधीसाधूंनी अनेकांकडून मोठय़ा रकमा उकळलेल्या आहेत. परंतु नोकरीचा पत्ता नाही. पुढील महिन्यात नोकरीचा आदेश घरपोच येईल, असे सांगून हे भामटे वेळ मारुन नेत आहे. परंतु कित्येक महिने उलटूनही नोकरी मिळत नसल्याचे पाहुन अनेकांनी या भामट्यांना पैसे परत करण्याचा आग्रह धरला आहे. परंतु हे भामटे पैसे परत द्यायला तयार नाहीत. काही भामट्यांचा तर ठावठिकाणाही नाही.
फसवणूक झालेल्या काही जणांनी पोलीस ठाण्यात तक्रार करण्याची तयारीही केली. परंतु थोडे दिवस थांबा, लवकरच नोकरीचा आदेश तुम्हाला घरपोच येईल, आतापर्यंत लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता होती, आता शिक्षक मतदार संघाची निवडणुकीची आचारसंहिता आहे, असे सांगून हे भामटे सुशिक्षित बेरोजगारांच्या पैशावर मजा मारत आहेत. कित्येक आई-वडिलांनी आपल्या मुलांच्या सुखासाठी आयुष्याची कमाई खर्ची घातली. मात्र पदवीच्या प्रमाणपत्रासह लाखो रुपये देऊनही नोकरी मिळत नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
या परिस्थितीचा लाभ काही चाणाक्ष भामट्यांनी घेतला आहे. बेरोजगारांना नोकरी लावून देण्याचे आमिष देत त्यांच्याकडून पैसे  उकळण्याच्या प्रकारात वाढ होत आहे. बेरोजगारांच्या पैशावर मौज करीत राजकीय पक्षांची पदे कॅश करणारे काही युवकही कार्यरत आहेत. तालुक्यात आतापर्यंत अनेक सुशिक्षित बेरोजगारांची फसवणूक झाली आहे. युवकांनी अशा भामट्यांपासून सावध राहण्याची आवश्यकता आहे. पोलिसांनीही याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
 

Web Title: Bhamte, who lent millions of money in Pandharkawada taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.