स्पर्धा परीक्षेत भरारी घेणारी भंडारीची शाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2019 05:00 AM2019-12-23T05:00:00+5:302019-12-23T05:00:40+5:30
भंडारी हे गाव म्हणजे केवळ पुसद तालुकाच नव्हे तर यवतमाळ जिल्ह्याच्याही शेवटच्या टोकावर वसलेले दुर्गम ठिकाण आहे. पूर्वी या शाळेत येण्यासाठी विद्यार्थीच नव्हे तर भरभक्कम पगार असलेले शिक्षकही तयार नव्हते. मात्र गेल्या काही वर्षात येथे आलेल्या उपक्रमशील शिक्षकांच्या चमूने शाळेचे रुपडे पालटून कीर्ती वाढविली आहे. त्यामुळे आता भंडारीसह परगावातील विद्यार्थीही या शाळेत आवडीने दाखल होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : गोरगरिबांची खेड्यापाड्यात अभावग्रस्त जीवन जगणारी निरागस मुलेही स्पर्धेच्या युगात पुढे गेली पाहिजे, या निर्धाराने पुसद तालुक्यातील भंडारी येथील जिल्हा परिषद शाळा वेगळी वाटचाल करीत आहे. दैनंदिन अभ्यासक्रमासोबतच चक्क प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांकडूनच स्पर्धा परीक्षेची तयारी करवून घेण्याचा या शाळेचा पायंडा उपयुक्त ठरला आहे.
भंडारी हे गाव म्हणजे केवळ पुसद तालुकाच नव्हे तर यवतमाळ जिल्ह्याच्याही शेवटच्या टोकावर वसलेले दुर्गम ठिकाण आहे. पूर्वी या शाळेत येण्यासाठी विद्यार्थीच नव्हे तर भरभक्कम पगार असलेले शिक्षकही तयार नव्हते. मात्र गेल्या काही वर्षात येथे आलेल्या उपक्रमशील शिक्षकांच्या चमूने शाळेचे रुपडे पालटून कीर्ती वाढविली आहे. त्यामुळे आता भंडारीसह परगावातील विद्यार्थीही या शाळेत आवडीने दाखल होत आहे.
रोजमजुरीसाठी स्थलांतरित होणाऱ्या मजुरांच्या मुलांचे स्थलांतर रोखण्यात भंडारीच्या शाळेला यश मिळाले. या शाळेने चालविलेल्या हंगामी वसतिगृहाला चांगला प्रतिसाद आहे. जादा वर्ग घेऊन शाळेत विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षेची मोफत तयारी करून घेतली जाते. उन्हाळी सुटीत निवासी स्वरूपाचे सुसंस्कार शिबिर घेतले जाते. यात विद्यार्थ्यांसह प्रौढ पालकही सहभागी होतात. नियमित पालकसभा आणि मातृप्रबोधन कार्यशाळा घेतली जाते. शालेय परिसर हिरवागार आणि गाव परिसरातही वृक्षारोपण व संवर्धन करणारी भंडारी जिल्हा परिषद शाळा आकर्षण ठरली आहे.
गावकरी वाचनालय रुजविले
भंडारीच्या शाळेने लोकसहभाग मिळवून गावात चक्क गावकरी वाचनालय सुरू केले. त्यामुळे विद्यार्थ्यांसह गावातील रोजमजुरी करणाºया पालकांनाही वाचनाची सवय लागली आहे.
भंडारीत सुरू झालेला स्नेहभोजनाचा उपक्रम नंतर शासनाने राज्यभरात लागू केला, हे विशेष. भंडारीत आजही या उपक्रमात मिष्ठान्नासह पौष्टीक आहारही विद्यार्थ्यासह पालकांनाही दिला जातो. गरीब गरजू विद्यार्थ्यांना या शाळेतील शिक्षक स्वखर्चाने साहित्य पुरवितात.
आमच्या एकूण पटापैकी ४६ टक्के मुले बाहेरगावची आहेत. वाहतुकीच्या साधनांचा अभाव असल्याने इच्छा असूनही परगावातील अनेक मुलांना भंडारीत येता येत नाही. प्रगती दिसली तर पालक माध्यम व इतर गोष्टी पाहत नाही. पालकांचे समाधान आणि बालकांचा सर्वांगीण विकास हेच आमच्या शाळेचे ध्येय आहे.
- गणेश एस. चव्हाण, मुख्याध्यापक
आम्हा गावकऱ्यांना आमच्या शाळेचा अभिमान आहे. शिक्षकांच्या मेहनतीचे फळ म्हणजे यंदा पाच विद्यार्थी नवोदयसाठी पात्र ठरले.
- गजानन इंगोले, अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती
आमच्या शिक्षकांनी गावातील सामाजिक कार्यातही मोठा सहभाग घेतला. गणेश चव्हाण यांच्यामुळे शाळेचा कायापालट झाला.
- मनोहर जाधव,पालक