‘भीम पहाट’ने विचारांच्या उत्सवाला सुरांचा साज
By admin | Published: April 15, 2017 12:14 AM2017-04-15T00:14:34+5:302017-04-15T00:14:34+5:30
‘उद्धरली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे’ अशी कृतार्थतेची भावना जोजवीत भीमजयंतीची पहाट उगवली...
बाबासाहेबांना विनम्र अभिवादन : तोफांची सलामी, सर्वत्र निळे वातावरण
यवतमाळ : ‘उद्धरली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे’ अशी कृतार्थतेची भावना जोजवीत भीमजयंतीची पहाट उगवली अन् ‘भारत के संविधान को लिखना सब के बस की बात नही’ अशी दवंडी पिटवित अख्खा दिवस समतेच्या सुरांनी व्यापून उरला... भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त अख्ख्या यवतमाळ शहरावर जणू निळे नभ उतरले होते. शहराच्या कानाकोपऱ्यातील भीमभक्तांचा उत्साह बसस्थानक चौकातील बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ एकवटला होता.
पुतळा परिसरातच आयोजित करण्यात आलेल्या ‘भीम पहाट’ कार्यक्रमाने विचारांच्या उत्सवाला सुरांचा साज चढविला. गायकांनी भीमगीते सादर करून बाबासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी अनेकांच्या डोळ्यांच्या कडा आपसूकच ओलावल्या होत्या.
पांढरेशुभ्र वस्त्र परिधान केलेले महिला-पुरुष शिस्तीत रांगेत उभे राहून बाबासाहेबांच्या पुतळ्याचे दर्शन घेत होते. डोक्यावर निळे फेटे बांधलेल्या तरुणांनी लक्ष वेधून घेतले. हजारो अनुयायांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून बाबासाहेबांचा जयघोष केला. बसस्थानक चौकात पहाटेपासूनच डॉ. बाबासाहेबांच्या अनुयायांनी एकच गर्दी केली होती. येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे साहित्य विक्रीकरिता उपलब्ध होते. विविध कॅसेट, स्टिकर, झेंडे आणि टोप्यांचाही यात समावेश होता.
भीम जयंतीच्या अनुषंगाने पहाटे शहरातून स्कूटर रॅली काढण्यात आली. रॅलीत युवक आणि युवतींचा मोठ्या प्रमाणात समावेश होता. निळे फेटे परिधान केलेले युवक, युवती लक्षवेधी दिसत होते. सकाळी निघालेल्या शोभायात्रेचे स्वागत करण्यासाठी शहरातील विविध चौकात स्टॉल उभारण्यात आले. बसस्थानक चौकात उमरसरामधील जय भीम स्टॉलने भोजनाची व्यवस्था केली. मेडिकल कॉलेज चौकात ‘एकच साहेब, बाबासाहेब’ मंडळाने भोजनाचा स्टॉल लावला होता. लोहारा परिसरातील सानेगुरूजी नगरात अत्यंत उत्साहात भीम जयंती साजरी करण्यात आली. याशिवाय तहसील चौक, नेताजी चौक, वडगाव, लोहारा, वाघापूर, पिंपळगावमध्ये विविध कार्यक्रम घेण्यात आले. शहराच्या विविध भागांमध्ये आकर्षक रांषणाई करण्यात आली. ठिकठिकाणी पताका आणि ध्वज लावण्यात आले. विविध भागातून रॅली काढण्यात आली. (शहर वार्ताहर)