प्रकाशच्या जीवाचा सौदा दोन लाखांत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 09:48 PM2017-11-11T21:48:57+5:302017-11-11T21:50:20+5:30
प्राणघातक हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या प्रकाश आत्राम या युवकाच्या खुनाचे प्रकरण दडपण्यासाठी दोन लाखांत सौदा झाला होता.
सुदाम दारव्हणकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
रुंझा : प्राणघातक हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या प्रकाश आत्राम या युवकाच्या खुनाचे प्रकरण दडपण्यासाठी दोन लाखांत सौदा झाला होता. परंतु हे डिलिंग अर्ध्यातच फिस्कटल्याने प्रकरणाच्या सुमारे दीड-दोन महिन्यानंतर पांढरकवडा पोलीस ठाण्यात धाव घेण्यात आली. या प्रकरणी हल्ला करणाºया टेकाम पिता-पुत्रांविरुद्ध शुक्रवारी रात्री खुनाचा गुन्हा नोंदविला गेला.
पांढरकवडा तालुक्याच्या झोटींगधरा कोलाम पोडावरील हे प्रकरण आहे. २९ सप्टेंबर २०१७ रोजी सकाळी प्रकाश आत्राम (३३) या युवकावर गावातीलच टेकाम पिता-पुत्रांनी प्राणघातक हल्ला केला. उपचारादरम्यान ७ आॅक्टोबरला त्याचा मृत्यू झाला. तर घटनेच्या सुमारे दोन महिन्यानंतर ९ नोव्हेंबर रोजी या प्रकरणात मृत प्रकाशचा पिता आनंदराव आत्राम यांनी पांढरकवडा पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवून या प्रकरणाचे बिंग फोडले. शुक्रवारी पोलिसांनी दंडाधिकाºयांच्या उपस्थितीत प्रकाशचा जमिनीत पुरलेला मृतदेह बाहेर काढून जागीच उत्तरीय तपासणी केली. त्यानंतर नंदलाल टेकाम व त्याच्या दोन मुलांविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला. हे तिघेही बापलेक फरार आहे. पांढरकवडाचे एसडीपीओ अमोल कोळी यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार असलम खॉ पठाण फरार आरोपींच्या मागावर आहेत.
घटनेच्या दोन महिन्यानंतर पोलिसात फिर्याद नोंदविण्यामागील कारणांचा शोध घेतला असता या प्रकरणातील सौदेबाजी उघड झाली. खुद्द पोलिसांनीही त्याला दुजोरा दिला ंआहे.
पोटात सळाख खुपसल्याचा देखावा
प्रकाशवरील हल्ल्याचे प्रकरण पोलिसांपर्यंत नेऊ नये म्हणून दोन लाखांचे डिलिंग झाले होते. त्याकरिता प्रकाश पडल्याने त्याच्या पोटात लोखंडी सळाख खुपसल्याचा देखावाही निर्माण करण्यात आला होता. या डिलिंगनुसार, त्यातील दहा हजार रुपये औषधोपचारासाठी तातडीने तर ३० हजार रुपये नंतर दिले गेले. दोन लाखांची ही रक्कम सन २०२० पर्यंत अर्थात पुढील तीन वर्षात टप्प्याटप्प्याने देण्याचे ठरले. या काळात ही रक्कम दिली न गेल्यास त्या मोबदल्यात शेत नावावर करून देण्याचेही ठरले.
मोहदा येथील चौघांची मध्यस्थी
या डिलिंगसाठी मोहदा गावातील चौघांनी महत्वाची भूमिका वठविली. त्यातील एक जण लोकप्रतिनिधी असल्याचे सांगितले जाते. त्यांनी हे डिलिंग कायदेशीररीत्या रेकॉर्डवरही घेतल्याची चर्चा आहे. मात्र ४० हजार दिल्यानंतर धमक्या मिळाल्याने व उर्वरित पैसे मिळण्याची चिन्हे नसल्याने प्रकरण पोलिसात पोहोचल्याचे बोलले जाते. या प्रकरणाच्या खोलात गेल्यास बरेच काही निष्पन्न होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
डॉक्टरांची सूचना, पोलिसांनी घेतली बयाने
प्रकाश आत्राम याला २९ सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता रुंझा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. त्याच्या शरीरावरील जखम ही शस्त्राने भोसकल्याची असल्याची नोंद घेऊन वैद्यकीय अधिकारी डॉ. उपाध्ये यांनी रुंझा पोलीस चौकीच्या जमादारांना सूचित केले. त्यानुसार, पोलिसांनी ंआत्राम कुटुंबातील सदस्यांची बयाने नोंदविली. मात्र त्यांनी आमची आपसात तडजोड होत असल्याचे सांगून फिर्याद देणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर अवघ्या दोन लाखांत प्र्रकाशच्या जीवाचा सौदा झाला. मात्र तो फिस्कटल्याने हे प्रकरण पोलिसात पोहोचले. तडजोडीसाठी पुढाकार घेणाºया मोहद्यातील ‘त्या’ चौघांचा पांढरकवडा पोलीस या प्रकरणात साक्षीदार म्हणून उपयोग करून घेणार असल्याचे बोलले जाते.