लहान भावाने केला मोठ्या भावाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2019 06:00 AM2019-09-07T06:00:00+5:302019-09-07T06:00:15+5:30
जुळ्या भावांपैकी करणला आदिलाबाद येथे कामासाठी का पाठविले असा प्रश्न गुरुवारी रात्री अर्जुनने मोठा भाऊ गोपाल यास विचारला. यावेळी गोपाल हेडफोन लावून मोबाईलवर गाणे ऐकत होता. अर्जुनने विचारलेल्या प्रश्नाकडे गोपालचे लक्षच नव्हते. मात्र आपल्या प्रश्नाला गोपाल प्रतिसाद देत नाही असा गैरसमज झाल्याने रागाच्या भरात अर्जुनने गोपालवर लोखंडी पाईपने हल्ला चढविला.
लोकमत न्यूज नेटवर्क
महागाव : घरगुती क्षुल्लक वादातून लहान भावाने मोठ्या भावाचा लोखंडी पाईपने हल्ला चढवून निर्घृण खून केल्याची घटना तालुक्यातील चिल्ली इजारा या गावात गुरुवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली.
गोपाल पांडुरंग राठोड असे मृताचे नाव आहे. महागावपासून १३ किलोमीटर अंतरावर चिल्ली इजारा येथे गोपालचे आईसह चार जणांचे कुटुंब आहे. त्यात तीन भावंडे आहेत. त्यापैकी करण-अर्जुन हे दोघे जुळे आहेत. एक विवाहित बहीण आदिलाबादला राहते. जुळ्या भावांपैकी करणला आदिलाबाद येथे कामासाठी का पाठविले असा प्रश्न गुरुवारी रात्री अर्जुनने मोठा भाऊ गोपाल यास विचारला. यावेळी गोपाल हेडफोन लावून मोबाईलवर गाणे ऐकत होता. अर्जुनने विचारलेल्या प्रश्नाकडे गोपालचे लक्षच नव्हते. मात्र आपल्या प्रश्नाला गोपाल प्रतिसाद देत नाही असा गैरसमज झाल्याने रागाच्या भरात अर्जुनने गोपालवर लोखंडी पाईपने हल्ला चढविला. यात गोपालचा जागीच मृत्यू झाला. पोलीस पाटील राजू राठोड यांनी घटनेची माहिती महागाव पोलिसांना दिली. पोलिसांनी रात्रीच मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पुसदला रवाना केला. आरोपी अर्जुन याने घटनेनंतर पोबारा केला. गोपालच्या वडिलांचा चार वर्षांपूर्वी अंगावर वीज पडल्याने मृत्यू झाला होता. मृतक गोपाल हा घरातील कमावता व्यक्ती होता. त्याच्या जाण्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. करण व अर्जुन यांना नृत्य व अभिनयाची आवड आहे. हा छंद जोपाण्यासाठी ते काही दिवसापूर्वी पुणे येथे गेले होते. मात्र संधी न मिळाल्याने ते गावात परतले. मात्र ते कुठेच काम करीत नसल्याने गोपालचा नेहमीच वैताग व्हायचा, त्यातूनच त्याने करणला रोजगार शोधण्यासाठी पाठविले होते.
मात्र हेच कारण गोपालच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरले. या घटनेचा तपास उमरखेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी विकास तोटावार यांच्या मार्गदर्शनात महागावचे ठाणेदार दामोधर राठोड, बीट जमादार माणिक पवार करीत आहे. आरोपी अर्जुन हा लगतच्या जंगलात लपून बसला असावा असा संशय आहे. त्या दृष्टीने पोलिसांनी त्याची शोधमोहीम चालविली आहे.