नेर तालुक्यात वादळाने मोठी हानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 10:12 PM2019-06-05T22:12:16+5:302019-06-05T22:12:43+5:30
गेली दोन दिवसांपासूनच्या वादळामुळे नेर तालुक्यात मोठी हानी झाली. घरांची पडझड, उडालेली टीनपत्रे, जनावरांचा मृत्यू या प्रकाराने लोकांचे नुकसान झाले. दोन दिवसांपासून वीज पुरवठा बंद असल्याने अंधार आणि उकाड्याचा सामना नागरिकांना करावा लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नेर : गेली दोन दिवसांपासूनच्या वादळामुळे नेर तालुक्यात मोठी हानी झाली. घरांची पडझड, उडालेली टीनपत्रे, जनावरांचा मृत्यू या प्रकाराने लोकांचे नुकसान झाले. दोन दिवसांपासून वीज पुरवठा बंद असल्याने अंधार आणि उकाड्याचा सामना नागरिकांना करावा लागत आहे.
तालुक्याच्या काही भागात पाऊस झाला. वादळाचा तडाखा मोझर, टेंभी, शिरसगाव आदी परिसराला बसला. मोझर येथे किरण चव्हाण या महिलेसह काही लोकांना किरकोळ दुखापत झाली. बालू निचत यांच्या कृषी मालाच्या गोडाऊनवरील टीनपत्रे उडाली. एक म्हैस दगावली. काही भागात वीज खांब कोसळले, तारा तुटल्या. वीज बंद असल्याने पीठगिरणीसारखे व्यवसाय ठप्प झाले आहेत.
चिकणी (डोमगा) येथील शेख अनिस यांचे कुक्कुट पालनाचे शेड वाऱ्यामुळे उडाले. या प्रकारात जवळपास ३०० कोंबड्या मृत झाल्याचे सांगण्यात आले. या परिसरातील काही फळबागांनाही वादळाचा फटका बसला. जिल्हा परिषद सदस्य निखिल जैत पाटील यांच्या बगीच्यातील लिंबाची ३० झाडे जमिनदोस्त झाली. हौसाबाई आश्रमशाळेची टीनपत्रे उडाली. झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करून भरपाई मिळावी, अशी अपेक्षा आहे. काही ठिकाणी महसूल विभागाकडून नुकसानीचे सर्वेक्षण करण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे.
शिरसगाव परिसरात घरांची पडझड, वीज तारा तुटल्या
शिरसगाव(पांढरी) : मंगळवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसाने परिसरात मोठे नुकसान झाले. अनेकांच्या घराची पडझड झाली. टीनपत्रे दूरपर्यंत उडाली. वीज तारा तुटल्याने गेली दोन दिवसांपासून सर्वत्र अंधार आहे. सकाळपासूनच वातावरणात बदल जाणवू लागला होता. सायंकाळच्या सुमारास वादळी वाºयाला सुरुवात झाली. सोबतच मूसळधार पाऊसही बरसला. वाºयामुळे अनेक नागरिकांच्या घरावरील टीनपत्रे उडून गेल्यामुळे त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. पावसाने भिजलेल्या अंथरूण-पांघरुणावर त्यांना रात्र काढावी लागली. वीज पुरवठा खंडित झाल्याने अंधाराचाही सामना करावा लागला. झालेल्या नुकसानीचा सर्वे करून नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी होत आहे.