मरणाऱ्यापेक्षा तारणारा ठरला मोठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 09:29 PM2019-02-11T21:29:28+5:302019-02-11T21:30:21+5:30
मारणाऱ्या किंवा मरणाऱ्यापेक्षा नेहमीच तारणारा मोठा ठरतो. त्याचा प्रत्यय शुक्रवारी येथे आला. शुक्रवारी दुपारची सुनसान वेळ. मधल्या सुटीतून एक विद्यार्थिनी शिक्षकांना पोटदुखीचे कारण सांगून घराकडे जात होती. तिने सायकल व दप्तर शिक्षक कॉलनीतील विहिरीच्या बाजूला ठेवले आणि क्षणार्धात तिने विहिरीत उडी मारली. हा प्रकार दुसऱ्यां छोट्या मुलाने पाहिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरखेड : मारणाऱ्या किंवा मरणाऱ्यापेक्षा नेहमीच तारणारा मोठा ठरतो. त्याचा प्रत्यय शुक्रवारी येथे आला.
शुक्रवारी दुपारची सुनसान वेळ. मधल्या सुटीतून एक विद्यार्थिनी शिक्षकांना पोटदुखीचे कारण सांगून घराकडे जात होती. तिने सायकल व दप्तर शिक्षक कॉलनीतील विहिरीच्या बाजूला ठेवले आणि क्षणार्धात तिने विहिरीत उडी मारली. हा प्रकार दुसऱ्यां छोट्या मुलाने पाहिला. त्याने लगेच विनोद सुंदरसिंग जाधव या वाहतूक पोलिसाला फोन केला. विनोद त्वरित विहिरीवर आला अन् त्याने कोणताही विचार न करता विहिरीत उडी घेतली. विनोदने त्या तरुण विद्यार्थिनीचे प्राण वाचविले यातून मरणाºयापेक्षा वाचविणारा मोठा ठरल्याचा प्रत्यय नागरिकांना आला.
शहरातील एका प्रसिद्ध शाळेत दहावीत शिकणारी ही विद्यार्थिनी होती. वाहतूक पोलीस शिपाई विनोदने आपल्या प्राणाची बाजी लावून तिला जीवदान दिले. यातून विनोदने ‘सद्रक्षणाय, खलनिग्रहणाय’ हे ब्रिद खरे ठरविले. त्याला बोरबन येथील रीक्षा चालक मारोती वाघमारे यानेही मदत केली. त्यानेही तरुणीचे प्राण वाचविण्यात मोलाची भूमिका बजावली.
पोलिसांबद्दल सतत उलटसुलट चर्चा होतात. मात्र विनोदच्या कामगिरीचे सर्वांनी कौतुक केले. पालिकेची अग्निशमन यंत्रणा घेऊन नगराध्यक्ष नामदेव ससाणे, उपाध्यक्ष अरविंद भोयर यांनीही लगेच घटनास्थळ गाठले. अग्नीशमन यंत्रणेत व्ही.व्ही. शिंदे, फायरमन संजय पवार, अनिल काळबांडे, अब्दुल वाजीद, सहाय्यक पोलीस निरीक्षक इंगोले, बीट जमादार रोशन सरनाईक, शिपाई बंडकर यांनीही घटनास्थळ गाठून बाहेर काढलेल्या तरूणीला शासकीय रुग्णालयात दाखल केले.
विहिरीला जाळी लावलीच नाही
शहरात पाणीटंचाई असताना अबरार-मामीडवार लेआऊटमधील शिक्षक कॉलनीत या विहिरीला वर्षभर पाणी असते. या विहिरीत यापूर्वी एका तरुणाने आत्महत्या केली होती. त्यामुळे विहिरीची डागडुजी करून जाळी लावण्याची मागणी नगरसेविका सविता पाचकोरे, गजेंद्र ठाकरे यांनी केली होती. त्यांनी सभागृहात ही समस्या मांडली. मात्र अद्याप त्याची दखल घेतली गेली नाही. रविवारी घडलेल्या या घटनेने पाणी पुरवठा सभापती दिलीप सुरते यांनी येत्या आठ दिवसांत प्रश्न निकाली काढू, असे सांगितले.