बाईकचे इंजिन बदलून देण्याचा आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 10:32 PM2018-06-30T22:32:47+5:302018-06-30T22:33:27+5:30
नवीन घेतलेल्या होंडा शाईन बाईकच्या आवाजाने त्रस्त ग्राहकाला न्याय तर, साई पॉर्इंट आणि होडा मोटर्सला ग्राहक न्यायालयाने चपराक दिली आहे. मोटरसायकलला नवीन इंजिन आणि इतर बाबींचे दहा हजार रुपये द्यावे, असा आदेश मंचाने दिला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : नवीन घेतलेल्या होंडा शाईन बाईकच्या आवाजाने त्रस्त ग्राहकाला न्याय तर, साई पॉर्इंट आणि होडा मोटर्सला ग्राहक न्यायालयाने चपराक दिली आहे. मोटरसायकलला नवीन इंजिन आणि इतर बाबींचे दहा हजार रुपये द्यावे, असा आदेश मंचाने दिला आहे.
आर्णी तालुक्याच्या साकूर येथील शेतकरी शिवराज अशोकराव शिंदे यांनी दाखल केलेल्या तक्रारीवर मंचचे अध्यक्ष रवींद्र नगरे, सदस्य अॅड. आश्लेषा दिघाडे व सुहास आळशी यांनी हा निर्णय दिला आहे.
शिवराज शिंदे यांनी यवतमाळ येथील साई पॉर्इंट आॅटो प्रा.लि.मधून होंडा बाईक (शाईन) खरेदी केली. तेथून १० ते १२ दिवसापासूनच इंजिनमधून आवाज सुरू झाला. साई पॉर्इंटमध्ये दाखविली असता आपोआप बंद होईल, असे सांगितले गेले. हा दिवस उजाडलाच नाही. दरम्यान, विविध प्रकारच्या दुरुस्त्या केल्या गेल्या. वॉरंटी कालावधी असतानाही शिंदे यांच्याकडून दुरुस्ती आणि इतर स्पेअर पार्टच्या नावाखाली रक्कम घेण्यात आली. २० हजार ९४३ रुपये ९६ पैसे एवढा खर्च त्यांना करावा लागला. तरीही आवाज कमी झाला नाही.
अखेर शिवराज शिंदे यांनी यवतमाळ जिल्हा ग्राहक न्यायालयात धाव घेतली. दाखल तक्रारीवर दोनही बाजूंचा युक्तिवाद ऐकून मंचाने आपला निकाल दिला. वाहनात उत्पादकीय दोष असताना चुकीची व तर्काला न पटणारी कारणे दिली, तक्रारकर्त्याची दिशाभूल केली, सदोष सेवा दिली. त्यामुळे साई पॉर्इंट आॅटो प्रा.लि. आणि होंडा मोटर्स लि. पुणे यांनी शिंदे यांच्या दुचाकीचे इंजिन बदलवून सुस्थितीतील वाहन द्यावे, शारीरिक व मानसिक त्रासाचे पाच हजार आणि तक्रार खर्चाचे पाच हजार रुपये द्यावे, असा आदेश दिला आहे.
वाहन निष्काळजीपणे चालविल्याचा ‘साई’तर्फे युक्तिवाद
वाहन निष्काळजीपणाने चालविल्याने त्यात दोष निर्माण झाला. वाहनधारकाला तोंडी सूचना देऊनही दुर्लक्ष करण्यात आले. वारंवार क्लच दाबणे, ब्रेकिंग करणे, अयोग्यवेळी गिअर बदलविणे आदी प्रकारामुळे वाहनात बिघाड झाला, अशी बाजू साई पॉर्इंटतर्फे कारवाई दरम्यान मांडण्यात आली होती.