पिरंजी येथे बळीराज चेतना अभियान
By admin | Published: September 15, 2015 05:15 AM2015-09-15T05:15:30+5:302015-09-15T05:15:30+5:30
जिल्हा प्रशासनाच्यावतीने उमरखेड तालुक्यातील पिरंजी येथे सोमवारी बळीराज चेतना अभियान राबविण्यात येऊन
उमरखेड : जिल्हा प्रशासनाच्यावतीने उमरखेड तालुक्यातील पिरंजी येथे सोमवारी बळीराज चेतना अभियान राबविण्यात येऊन जनजागृती करण्यात आली. यावेळी महसूल अधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पिरंजी येथे सकाळी ९.३० वाजता गावातून प्रभातफेरी काढण्यात आली. यामध्ये शालेय विद्यार्थी शिक्षक व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी लेझीमसह सहभाग घेतला. गावातील महिला डोक्यावर कळस घेऊन यामध्ये सहभागी झाल्या होत्या. गावातील दिलीप मुरमुरे यांनी आपली सजविलेली बैलगाडी प्रभातफेरीसाठी आणली होती. ही बैलगाडी नागरिकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली होती. गावातील अनेक मंडळांनी प्रभातफेरी स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदविला.
पुजाराम सूर्यवंशी यांनी संत गाडगेबाबांच्या भूमिकेत गावकऱ्यांना मार्गदर्शन करून स्वच्छता अभियानाचे महत्व पटवून दिले. ही प्रभातफेरी हनुमान मंदिरावर पोहोचली. त्याठिकाणी प्रभातफेरीचे रुपांतर सभेत झाले. उमरखेडचे तहसीलदार सचिन शेजाळ, मंडळ अधिकारी राम पंडीत, तलाठी गजानन सुरोशे, अमोल पातुरकर, दत्तात्रय दुर्लेवार, कृषी विभागाचे कर्मचारी, मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कीर्तनकार नागोराव मुळे महाराज यांनी शेतकऱ्यांना आत्महत्या न करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमासाठी गणेश महाराज, दादाराव महाराज, मारोतराव चव्हाण, नत्थुजी महाराज आदींची उपस्थिती होती. अभियानासाठी सरपंच अरुणा पाईकराव, कानबा भुसाळे, साहेबराव भावाळ, गणेश काळे, श्यामराव नखाते आदींनी परिश्रम घेतले.
(शहर प्रतिनिधी)