बळीराजा चेतना अभियानाला पुन्हा मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 09:13 PM2019-04-21T21:13:56+5:302019-04-21T21:15:17+5:30

बळीराजा चेतना अभियानाच्या अंमलबजावणीचा अहवाल त्रयस्त संस्थेने राज्य शासनाकडे पाठविला आहे. यासोबतच जिल्हा प्रशासनाने अभियान सुरू ठेवण्यासाठी महसूल विभागाकडेही प्रस्ताव पाठविला होता.

Biliraja Chetana again extended the campaign | बळीराजा चेतना अभियानाला पुन्हा मुदतवाढ

बळीराजा चेतना अभियानाला पुन्हा मुदतवाढ

googlenewsNext
ठळक मुद्देपेरणीसाठी साडेतीन कोटी : शेतकऱ्यांच्या मुलींच्या लग्नासाठी अडीच कोटींचा निधी

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : बळीराजा चेतना अभियानाच्या अंमलबजावणीचा अहवाल त्रयस्त संस्थेने राज्य शासनाकडे पाठविला आहे. यासोबतच जिल्हा प्रशासनाने अभियान सुरू ठेवण्यासाठी महसूल विभागाकडेही प्रस्ताव पाठविला होता. या दोन्ही बाबींचा संयुक्त विचार झाल्यानंतर अभियानाला वर्षभराची मुदतवाढ मिळण्याची दाट शक्यता असून तूर्त जिल्हा प्रशासनाने आपल्या स्तरावर महिनाभराची मुदतवाढ केली आहे.
यामुळे अडचणीत सापडलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अभियानातून साडेतीन कोटी रुपयांची मदत दिली जाणार आहे. यासोबतच शेतकऱ्यांच्या मुलींच्या लग्नासाठी निधीही महिला बालकल्याण विभागाकडे वळता करण्यात आला आहे. २०१५ पासून बळीराजा चेतना अभियानाची अंमलबजावणी सुरू झाली होती. या अभियानाच्या माध्यमातून शेतकºयांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या. यामध्ये शेतकऱ्यांचे प्रबोधन करणे, कार्यशाळा घेणे, आर्थिक मदत करणे आणि आरोग्यासाठी निधी पुरविणे, सामूहिक विवाह मेळावे घेणे यासह विविध बाबींचा यामध्ये समावेश आहे. या अभियानाच्या माध्यमातून गत चार वर्षामध्ये काय बदल झाले, याचा अभ्यास करण्यासाठी त्रयस्थ संस्थेमार्फत सर्वेक्षण करण्यात आले. यानंतर हा अहवाल राज्य शासनाकडे सादर झाला.
आता या अभियानाला मुदतवाढ देण्यात आली. यामुळे आचारसंहितेपूर्वी बळीराजा चेतना अभियानाने साडेतीन कोटी रुपयांचा निधी जिल्हा परिषदेकडे वळता केला. तर दोन कोटी ३६ लाख रुपयांचा निधी महिला व बालविकास विभागाकडे वळता करण्यात आला. या निधीतून यावर्षीच्या हंगामात विविध उपाययोजना करण्यात येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना लाभ दिला जाणार आहे. प्रत्येक ग्रामस्तरीय समितीला ३० हजार रूपयांचा निधी दिला जाणार आहे. त्यातून ६ शेतकऱ्यांना निधीचे वितरण केले जाणार आहे. पेरणीसाठी मदत म्हणून हा निधी दिला जाणार आहे. याकरिता ग्रामपंचायतीला ग्रामसभेत बहुमताचा ठराव घेऊन शेतकऱ्यांची निवड करायची आहे. यानंतर हा निधी शेतकऱ्यांना वितरीत करायचा आहे. शेतकऱ्यांच्या मुलींसाठी सामूहिक विवाह सोहळ्याकरिता निधी वितरित करण्यात आला आहे. यासोबतच विविध उपाययोजनांची अंमलबजावणी होणार आहे.

बळीराजा चेतना अभियानाच्या मुदतवाढीसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविलेला आहे. तूर्त जिल्हा प्रशासनाने आपल्या स्तरावर महिनाभराची मुदतवाढ दिली आहे. अंमलबजावणीसाठी लागणारा निधी संबंधित विभागाकडे वळता करण्यात आला आहे. यासोबतच या हंगामात विविध उपाययोजनांची अंमलबजावणी होणार आहे.
- ललित वऱ्हाडे, निवासी उपजिल्हाधिकारी, यवतमाळ

Web Title: Biliraja Chetana again extended the campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी