उमरखेडमध्ये विशिष्ट भागातच झाली कोट्यवधींची विकास कामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:44 AM2021-09-03T04:44:48+5:302021-09-03T04:44:48+5:30
अविनाश खंदारे फोटो उमरखेड : शहरातील वाढत्या अतिक्रमणामुळे रस्ते दिवसेंदिवस अरुंद होत आहे. पालिकेकडून मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष केले ...
अविनाश खंदारे
फोटो
उमरखेड : शहरातील वाढत्या अतिक्रमणामुळे रस्ते दिवसेंदिवस अरुंद होत आहे. पालिकेकडून मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. कोट्यवधी रुपयांच्या योजना विशिष्ट भागातच राबवल्याची ओरडही कायम आहे.
कोट्यवधींच्या याजना राबवूनही पाहिजे त्या प्रमाणात शहराचा विकास झाला नाही. विविध योजनांचे मिळालेले कोट्यवधी रुपये काही विशिष्ट भागातच जास्त प्रमाणात खर्च केल्याचे दिसून येत आहे. येथे २०१६ मध्ये भाजपाची सत्ता आली. योगायोगाने त्यावेळी राज्यात भाजप, शिवसेनेचे सरकार होते. तत्कालीन आमदार राजेंद्र नजरधने भाजपाचे होते. परिणामी राज्यात सत्ता असल्यामुळे अनेक विकासात्मक कामांसाठी शासनाकडून कोट्यवधी रुपये नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी मिळाले. परंतु तो निधी नाथनगर, पाटीलनगर यासह काही विशिष्ट भागातच खर्ची घालण्यात आला.
गोकूळनगर, मोहननगर, महसूल कॉलनी, व्यंकटेशनगर, शिवाजीनगर, आदिवासी कॉलनी, कारखाना कॉलनी, जिजाऊनगर, वसनगर, बोरबन, शिक्षक कॉलनी यासह अनेक प्रभागात मूलभूत सुविधा पाहिजे त्या प्रमाणात नागरिकांना मिळाला नसल्याची ओरड या प्रभागातील नागरिक करीत आहे. नाल्या उपसल्या जात नाही. कचरा गाडी अनेक प्रभागात पोहोचत नाही. साथीचे आजार येऊ नये यासाठी उपाययोजना केल्या जात नाही. शहरात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढलेले आहे. त्यामुळे अपघात होत आहे. पालिकेकडून अतिक्रमणाकडे दुर्लक्ष होत आहे. नागरिकांच्या समस्या निवारण लवकर होईल, अशी अपेक्षा नागरिकांना आहे. परंतु पालिका प्रशासन त्यावर कोणतेही धोरणात्मक निर्णय घेत नसल्यामुळे रस्ते दिवसेंदिवस अरुंद होत.
कोट
शहरात नाली, रस्ता, तारा मंडळ, बगिचा, अभ्यासिका अशी ३५ कोटींची विकासात्मक कामे केली. बायोगॅस प्रकल्प, स्व. बाळासाहेब ठाकरे अभ्यासिका आणि खुल्या जागेच्या सौंदर्यीकरण अशी १५ कोटींची कामे प्रस्तावित केली आहे. शहरातील काही प्रभागात कामे राहिली. ती विकासात्मक निधी उपलब्ध होताच पूर्ण केली जातील.
नामदेव ससाने, नगराध्यक्ष, उमरखेड
कोट
शहरातील स्वच्छतेचे काम प्राधान्याने केली जात आहे. अनेक प्रभागात विकासात्मक निधीतून मोठ्या प्रमाणात कामे केली गेली. काही कामे सुरू आहेत. नवीन प्रभागात विकासात्मक निधी उपलब्ध होताच, त्या ठिकाणी कामे केली जातील. शहरातील अतिक्रमण काढण्यासाठी संबंधित सर्वच विभागांशी समन्वय करून वाढलेले अतिक्रमण काढले जाणार आहे.
चारूदत्त इंगुले, मुख्याधिकारी, उमरखेड
या समस्यांकडे द्यावे लागणार लक्ष
१) शहरातील वाढते अतिक्रमण नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. हे अतिक्रमण हटविणे गरजेचे आहे. या समस्येकडे तातडीने लक्ष देणे अपेक्षित आहे. पालिकेने संबंधितांना नोटिसा देणे गरजेचे आहे. नागरिकांनी स्वतःहून अतिक्रमण न काढल्यास प्रशासनाने कारवाई करण्याची अपेक्षा आहे.
२) पालिकेच्या हद्दीत येणाऱ्या मोहननगर, आनंदनगर, गोकूळनगर, महसूल कॉलनी, मतेनगर, व्यंकटेशनगर, शिवाजीनगर, आदिवासी कॉलनी, कारखाना कॉलनी, जिजाऊनगर, बोरबन, चरडेनगर या सह अनेक प्रभागात रस्ता, नाली मूलभूत सुविधा मिळाल्या नाही. त्या त्वरित मिळतील, अशी अपेक्षा आहे.