कोट्यवधींचा खर्च, तरीही रुग्ण खासगीत

By admin | Published: August 12, 2016 02:16 AM2016-08-12T02:16:44+5:302016-08-12T02:16:44+5:30

ग्रामीण जनतेला तत्काळ आरोग्य सुविधा मिळावी म्हणून पुसद उपविभागात ठिकठिकाणी आरोग्य केंद्र, उपकेंद्रांची स्थापना करण्यात आली.

Billions of expenses, still the patient privately | कोट्यवधींचा खर्च, तरीही रुग्ण खासगीत

कोट्यवधींचा खर्च, तरीही रुग्ण खासगीत

Next

आरोग्यसेवा कोलमडली : ‘डॉक्टर आपल्या दारी योजना’ कुचकामी
प्रकाश लामणे पुसद
ग्रामीण जनतेला तत्काळ आरोग्य सुविधा मिळावी म्हणून पुसद उपविभागात ठिकठिकाणी आरोग्य केंद्र, उपकेंद्रांची स्थापना करण्यात आली. त्यावर कोट्यवधींचा खर्च केला जात आहे. मात्र येथे योग्य उपचार होत नसल्याने रुग्णांना खासगी डॉक्टरांचाच आधार घ्यावा लागतो. तर गोरगरिबांना गावातील बोगस डॉक्टरांकडून उपचार करून घेण्याची वेळ येते. ‘डॉक्टर आपल्या दारी’ या योजनेचाही पुरता फज्जा उडाला असून पावसाळी वातावरणातही अनेक आरोग्य उपकेंद्रांना चक्क कुलूप लागलेले दिसून येते.
सध्या पावसाळी वातावरण असल्याने आजाराचे प्रमाण वाढल्याने रुग्णालयांमध्ये प्रचंड गर्दी दिसून येत आहे. तालुक्यातील आरोग्य केंद्र केवळ तापाच्या गोळ्या देण्यापलीकडे कोणतेही काम करताना दिसत नाही. तर प्राथमिक आरोग्य केंद्रात योग्य सोयीसुविधा मिळत नाही. ग्रामीण भागातील आजारी पडलेला व्यक्ती प्रथम गावातील उपकेंद्रात जातो. तेथे कोणीही भेटत नसल्याने शेवटी आपल्या परिसरातील प्राथमिक आरोग्य केंद्र गाठतो. परंतु याठिकाणी डॉक्टरच भेटत नाही. कर्मचारी योग्य माहिती देत नाही. अशा स्थितीत आर्थिक भुर्दंड सहन करून रुग्ण पुसदला येतो. परंतु तोपर्यंत उपजिल्हा रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभाग बंद झालेला असतो. शेवटी नाईलाजाने रुग्णाला खासगी डॉक्टरांकडे न्यावे लागते. तेथे त्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. पुसदच्या उपजिल्हा रुग्णालयातही सुविधांचा अभाव असून रुग्ण दाखल झाल्यानंतर येथील डॉक्टरांना यवतमाळकडे पाठविण्याची घाई झालेली दिसते. ग्रामीण भागातील गंभीर रुग्णाला तत्काळ रुग्णालयात भरती करण्यासाठी वाहन उपलब्ध होत नाही. १०८ वाहनाची सुविधाही वेळेवर मिळत नाही. वाहनांचा शोध घेईपर्यंत रुग्णाची प्रकृती गंभीर होवून जाते. सर्व आटापिटा केल्यानंतरही रुग्णावर योग्य उपचार होईलच याची खात्री नसते.
ग्रामीण भागातील रुग्णांना योग्य उपचार गावातच मिळावे यासाठी १५ आॅगस्ट २००८ पासून ‘डॉक्टर आपल्या दारी’ योजना सुरू केली. मात्र पुसद उपविभागात या योजनेची पुरती वाट लागल्याची स्थिती आहे. डॉक्टर आपल्या दारी तर सोडा डॉक्टरांच्या दारी गेल्यानंतरही उपचार मिळण्याची सुतराम शक्यता नसते. ही योजना म्हणजे केवळ देखावा झाल्याचे दिसत आहे. अशा स्थितीत पैसे असलेले रुग्ण खासगी डॉक्टरांकडे धाव घेतात. परंतु अनेक रुग्णांकडे उपचाराचे पैसे नसतात. ती मंडळी गावात येणाऱ्या बोगस डॉक्टरांकडून उपचार करून घेतात. यात रुग्णांचा जीव जाण्याची अधिक शक्यता असते.

मुख्यालयाची अ‍ॅलर्जी
पुसद तालुक्यात फेट्रा, बेलोरा, शेंबाळपिंपरी, गौळ(बु), चोंढी, जांबबाजार या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. आरोग्य केंद्राच्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी सुसज्ज निवासस्थाने आहे. त्यावर लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. मात्र येथे एकही डॉक्टर आणि कर्मचारी राहात नाही. सोयीच्या ठिकाणावरून येणे-जाणे करतात. त्यामुळे गावातील या इमारती शोभेच्या झाल्या आहेत. जिल्हा आरोग्य विभागाकडूनही दखल घेतली जात नाही.
 

Web Title: Billions of expenses, still the patient privately

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.