सात भुसार व्यापाऱ्यांकडून कोट्यवधींची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:29 AM2021-07-18T04:29:32+5:302021-07-18T04:29:32+5:30
महागाव : तालुक्यातील सात भुसार व्यापाऱ्यांनी भोळ्याभाबड्या शेतकऱ्यांचे शेतमालाचे कोट्यवधी रुपये थकविले आहे. यात येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ...
महागाव : तालुक्यातील सात भुसार व्यापाऱ्यांनी भोळ्याभाबड्या शेतकऱ्यांचे शेतमालाचे कोट्यवधी रुपये थकविले आहे. यात येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एका संचालकाचाही समावेश असल्याची खात्रीलायक माहिती आहे.
भुसार व्यापाऱ्यांनी बाजारातील उतार भावात शेतकऱ्यांना विविध प्रलोभने देऊन, उधारीत अव्वाच्या सव्वा भावात भुसार माल खरेदी केला होता. बाजारात भाव पडल्यानंतर त्यांना मोठा घाटा झाला. त्यामुळे शेतकऱ्यांचे पूर्ण पैसे थकले. आपण आता शेतकऱ्यांना पैसे देऊ शकत नाही, याची जाणीव झाल्यानंतर संबंधित व्यापाऱ्यांनी स्वतः दिवाळखोर झाल्याचे घोषित करून तालुक्यातून पळ काढला. यातील ९० टक्के व्यापारी भूमिगत झाले आहे. काहींनी आपले गाव, शहर सोडून पोबारा केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हातावर तेल चोळत बसावे लागत आहे.
क्षणिक लाभासाठी व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचा माल खरेदी केला. किंबहुना दोन रुपये जास्त नफा मिळेल, या लालसेने संबंधित शेतकऱ्यांनीही आपला माल त्यांना विकला. त्यामुळे शेतकऱ्यांचे अवाढव्य नुकसान झाले. शेतकरी देशोधडीला लागले आहे. सावकारी व्यवहारात नोंदविल्या गेलेल्या तक्रारीनंतर एखादे वेळेस शेतकऱ्यांना किमान न्याय तरी मिळतो, परंतु या प्रकरणात ती सोय नाही. त्यामुळे शेतकऱ्यावर अन्याय होत आहे.
तालुक्यातील सवना, गुंज, अंबोडा, अनंतवडी, मुडाणा, काळी टेंभी, हिवरा व शहरातील भुसार व्यापाऱ्यांचा यात समावेश आहे. त्यांनी तब्बल दहा ते १५ कोटी रुपयांचा माल खरेदी केला होता. त्याचे सर्व पैसे त्यांनी आपल्याच घशात घातल्याचे फसवणूक झालेल्या काही शेतकऱ्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. मागील अनेक वर्षांपासून या क्षेत्रात काम करणाऱ्या काही भुसार व्यापाऱ्यांनी अनेक शेतकऱ्यांना अशा प्रकारे लाखोंचा गंडा घातला आहे. परिणामी, आता खासगी भुसार व्यापाऱ्यांची विश्वासार्हता कमी होत आहे. याकडे कृषी उत्पन्न बाजार समितीने लक्ष देउन शेतकऱ्याची आर्थिक लूट थांबविण्याची गरज आहे.
बॉक्स
शेतकऱ्यांनी घेतली पोलिसांत धाव
दरम्यान, नुकतीच दोन दिवसांपूर्वी एका भुसार व्यापाऱ्यावर पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यासाठी संबंधित शेतकऱ्यांनी धाव घेतली होती, परंतु सदर प्रकरणात अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नाही. दुसऱ्या एक व्यापाऱ्याने गुंज परिसरात शेतकऱ्यांना गंडा घातला. तो शेतकऱ्यांना पैसे देण्यास चालढकल करीत आहे.
कोट
कृषी उत्पन्न बाजार समितीने भुसार माल खरेदी करण्याचा परवाना देताना, किमान २० लाखांची साॅलव्हंसी त्या परवानाधारकांकडून घ्यावी. त्यामुळे तो जबाबदारीने काम करून शेतकऱ्यांना पैसे देऊ शकेल.
शिवाजीराव देशमुख, शेतकरी.
कोट
अधिकृत परवानाधारक व्यापाऱ्यांनाच शेतकऱ्यांनी शेतमाल विकला पाहिजे. त्याची पक्की पावती घेतली पाहिजे. अनेकदा असे होताना दिसत नाही. याबाबतीत अनेकांच्या तोंडी तक्रारी आल्या, परंतु त्यांनी पक्की पावती बाजार समितीकडे सादर केली नाही. त्यामुळे लुटल्या गेलेल्या शेतकऱ्यांना न्याय देता आला नाही.
दीपक आडे, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती, महागाव.