किरायाच्या सायकलींवर निघे जयंती मिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 10:08 PM2019-04-13T22:08:44+5:302019-04-13T22:09:15+5:30

थो टाईमच अल्लग होता. तवा बाबासाहेबाच्या जयंतीले आशा मोटारसायकली नाई राहाच्या.. तवा लोकं सायकलीवर बसून मिरवणूक कहाडाचे. सायकलीबी किरायानं घ्याचे. दोघ मिळून येक सायकल राहाची. सायकलीलेस का नाई तं झंडे बांधून न्याचे.

Birth Anniversary procession on rental bikes | किरायाच्या सायकलींवर निघे जयंती मिरवणूक

किरायाच्या सायकलींवर निघे जयंती मिरवणूक

Next
ठळक मुद्देडॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती : ८० वर्षांच्या रेणुकाबाई यांनी जागविल्या यवतमाळातील परिवर्तनाच्या आठवणी

अविनाश साबापुरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : थो टाईमच अल्लग होता. तवा बाबासाहेबाच्या जयंतीले आशा मोटारसायकली नाई राहाच्या.. तवा लोकं सायकलीवर बसून मिरवणूक कहाडाचे. सायकलीबी किरायानं घ्याचे. दोघ मिळून येक सायकल राहाची. सायकलीलेस का नाई तं झंडे बांधून न्याचे. आता जमाना बदलला, लोकं बी हुशार झाले. जयंतीची मिरवणूक बी झोकात काहाडतेत... पाटीपुरा परिसरातील ८० वर्षीय रेणुकाबार्इंचे हे शब्द आहेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती रविवारी साजरी होत आहे. त्यानिमित्त यवतमाळातील आंबेडकरी समाजाच्या बदलत्या परिस्थितीविषयी साधलेला संवाद...
यवतमाळातच जन्म आणि यवतमाळातच सासर असलेल्या रेणुका श्रावण गणवीर यांनी ८० वर्षांतील बाबासाहेबांच्या जयंती मिरवणुका पाहिल्या आहेत. एवढ्या वर्षातले बदल सांगताना त्या म्हणाल्या, मी पयले तलावफैलात राहो. तेथले मजूर गरीब आसन, पण बाबासाहेबाच्या जयंतीला लागन तेवढे पैसे द्याले सारे तयारस राहे. दोन-दोन महिन्यापयलेच वर्गण्या जमा कराले लागे. आताबी जयंतीसाठी पैसे खर्चाले कोणी मांग-पुढं पाहात नाई. आता करने सवरनेवाले पोरं लय हुशार झाले. मंडप मस्त करतेत. तवा निस्ता बँड राहे, आता डीजे लावतत. तलावफैलात येक आखाडा होता. सारे तिथंच जमे. पण ८० साली थो पडला. बाबासाहेबाच्या धोरणाच्यानंच तलावफैलातल्या मजुरायचे मस्त घरं झाले आता, पयले निस्त्या कौलाच्या झोपड्या होत्या. पण नुसते घरं नाई बदलले आता लोकं बदलले. पुस्तकं वाचाले लागले. नव्या पोराईले तं सबन समजाले लागलं. आसं करा, तसं करा म्हणून पोरंस आमाले सांगते....
रेणुकाबाई गणवीर यांनी अशा विविध आठवणींमधून यवतमाळातील बाबासाहेबांच्या जयंती कार्यक्रमांच्या आठवणी जागविल्या.

तवा पेपर नव्हते. बाया भारा आणाले जंगलात गेल्या का येकमेकीले बातम्या सांगे.. मस्त झालं वं बाबासाहेबाचं भाषण... - रेणुकाबाई गणवीर

बाबासाहेब गेले, थ्याच वर्सी महा लगन झालं. बाबासाहेब गेले म्हणून यवतमाळात हे फोनावर फोन याले लागले होते. साऱ्यायची धांदल उडून गेल्ती. लगनात बयनीनं आंदन म्हणून आणलेल्या भांड्यावर तारीख हाये... अशी आठवण रेणुकाबाई गणवीर सांगतात..!

बाबासाहेबांचं भाषण अन् दुधाची विक्री
रेणुकाबाई म्हणाल्या, यवतमाळात कवा बाबासाहेब आल्याचं माहीत नाई. पण येकडाव पुलगावले बाबासाहेबाचं रात्री भाषण झालं. यवतमाळातून लई लोक गेल्ते. माही शेजारी तेवरेबाई दुध विकाचा धंदा करे. थे जाऊन आल्ती. तेवरेबाई सांगे, बाबासाहेबाच्या भाषणामुळे भरमसाठ दूध खपलं थ्या रात्री. रातभर पाह्यलं बाबासाहेबाले आसं तेवरेबाई मले कितीतरी डाव अभिमानानं सांगे. आता तेवरेबाई मरणपावली. तिचं पोरगंबी आता म्हतारं झालं. जुना काळच अलग होता.

Web Title: Birth Anniversary procession on rental bikes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.