भाजप-सेनेचा रुग्णसेवा संघर्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2018 10:28 PM2018-01-27T22:28:38+5:302018-01-27T22:29:08+5:30
जिल्ह्यातील रूग्णसेवेचे पेटेंट शिवसेनेकडे आहे. त्यावरच घाव घालण्याचे काम भाजपाकडून केले जात आहे.
आॅनलाईन लोकमत
यवतमाळ : जिल्ह्यातील रूग्णसेवेचे पेटेंट शिवसेनेकडे आहे. त्यावरच घाव घालण्याचे काम भाजपाकडून केले जात आहे. यासाठी वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन म्हणून डॉ. मनीष श्रीगीरीवारांकडे प्रभार सोपविण्यात आला. पुढील विधानसभेची निवडणूक डोळ््यासमोर ठेवून भाजपाची यवतमाळात आखणी सुरू आहे. यामुळे भाजपा-शिवसेनेत रूग्णसेवा संघर्ष पेटला आहे.
यवतमाळ विधानसभा निवडणुकीत २०१४ मध्ये शिवसेनेच्या रुग्णसेवक उमदेवाराने भाजपा उमेदवार व विद्यमान मंत्री मदन येरावार यांना चांगलीच टक्कर दिली होती. हा धोका ओळखून भाजपा पुढील निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी करीत आहे. त्यासाठी वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अभ्यागत मंडळात शिवसेनेचा एकही प्रतिनिधी जाणार नाही, अशी व्यवस्था करण्यात आली. नंतर अभ्यागत मंडळ अध्यक्ष म्हणून आमदाराला नियुक्ती देण्यात आली. यातून आघाडी सरकारच्या काळातील खासदारांकडे अभ्यागत मंडळाचे अध्यक्षपद देण्याचा प्रघात मोडीत काढण्यात आला.
रूग्णालयातील शिवसेनेचे प्रस्थ मोडीत काढण्यासाठी भाजपाने एका प्राध्यापकावर जबाबदारी सोपविली. त्याचे पद्धतशीर नियोजन केले जात आहे. काँग्रेसच्या काळात रुग्णसेवक म्हणून सेवा देणाºयालाही भाजपाने आपल्या पदरी ठेवत अभ्यागत मंडळात स्थान दिले. प्रशासन अनुकूल करण्यासाठी ज्येष्ठांना डावलून डीनचा प्रभार डॉ. श्रीगिरीवारांकडे सोपविला गेला. नंतर शिवसेनेचा बिमोड करण्यास सुरूवात झाली. सर्वप्रथम महाविद्यालयीन कँटीनवर आघात करण्यात आला. मातोश्री सभागृहावरील वर्दळ कमी करण्यासाठी अनेक दिवसांपासून पडीत पडलेल्या भाजपाच्या अतिथीगृहाचे काम युुद्धपातळीवर सुरू केले गेले. आता तेथे रूग्णांच्या नातेवाईकांसाठी पूर्णवेळ अन्नछत्र कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. तरीही शिवसेनेचे शिलेदार गप्प असल्याने शिवसैनिकांची गोची झाली आहे.
पालकमंत्री आणि सहपालकमंत्री यांच्यातील छुप्या अजेंड्याप्रमाणे कुणी कुणाच्या मतदारसंघात लक्ष द्यायचे नाही, यावरून ही रणनीती आखली जात आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैैठकीतही सहपालकमंत्री अगदीच काही मिनिटांपुरते सहभागी होतात. त्यानंतरही त्यांच्या मतदारसंघातील कामे मार्गी लागतात. इतर भाजपा आमदारांना मात्र संघर्ष करावा लागतो, असे दिसून येत आहे.
रुग्णालयात सकारात्मक बदल
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सत्ताकाळात शिवसेनेच्या रुग्णसेवेला कधी आव्हान मिळाले नाही. मात्र भाजपाने शिवसेनेचे रुग्णसेवा पेटेंट हिरावण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यामुळे नजीकच्या काळात भाजप-सेनेतील रुग्णसेवा संघर्ष अधिक पेटण्याची चिन्हे आहेत. ८० टक्के समाजकारणाच्या नावाने राजकारणच होते, हे सर्वश्रृत असले, तरी या संघर्षामुळे मात्र रुग्णालयातील अंतर्गत प्रशासनात सकारात्मक बदल होत आहे. हा बदल कायमस्वरूपी राहावा व राजकीय पक्षातील तथाकथित रुग्णसेवकांची मक्तेदारी संपुष्टात यावी, एवढीच माफक अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांना आहे.