सर्वेक्षणातूनच ठरणार भाजपाचे उमेदवार
By admin | Published: July 5, 2014 11:48 PM2014-07-05T23:48:09+5:302014-07-05T23:48:09+5:30
विधानसभेसाठी भाजपाकडून सर्वेक्षण होत असून त्यात नाव आले तरच उमेदवारीचा विचार होईल, असे नेत्यांनी स्पष्ट केले.
विधानसभा : उमेदवारीसाठी शिष्टमंडळ भेटीला मनाई
यवतमाळ : विधानसभेसाठी भाजपाकडून सर्वेक्षण होत असून त्यात नाव आले तरच उमेदवारीचा विचार होईल, असे नेत्यांनी स्पष्ट केले.
भाजपाची दोन दिवसीय राज्य बैठक मुंबईत झाली. त्यासाठी जिल्हाभरातून पदाधिकारी गेले होते. या मेळाव्याच्या निमित्ताने अधिकाधिक पदाधिकाऱ्यांची आपल्या वाहनात जुळवाजुळव करून शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्नही केला गेला. काँग्रेस-राष्ट्रवादीला आणखी खिळखिळे करण्यासाठी पक्षात येऊ इच्छिणाऱ्यांकरिता भाजपाचे दरवाजे खुले करण्याचे ठरले. सत्ता हे मुख्य टार्गेट ठेवण्यात आल्याने जो येईल त्याला भाजपात सामावून घेतले जाणार आहे. उमेदवारी मिळविण्यासाठी शिष्टमंडळांनी नेत्यांच्या भेटी घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यासाठी स्पष्ट शब्दात मनाई करण्यात आली. वैयक्तिक भेटीसाठी मात्र नेत्यांचे दरवाजे खुले ठेवण्यात आले होते. विधानसभेसाठी प्रत्येक मतदारसंघात सर्वेक्षण केले जाईल, त्या सर्वेक्षणात नाव आले तरच उमेदवारीचा विचार होईल, असे पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी राजीवप्रताप रुढी यांनी सांगितले. त्याचवेळी हे सर्वेक्षण मॅनेज नको असा सूरही कार्यकर्त्यांमधून उमटला. यावेळी केवळ राज्याचेच नव्हे तर राष्ट्रीय भाजपाकडूनही सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यामुळे उमेदवारीसाठी सर्वेक्षणातून टॉपर राहणे हाच एक पर्याय शिल्लक आहे. शिवाय पक्षाच्या खासदाराचा शब्दही उमेदवारीसाठी प्रमाण मानला जाणार आहे. यवतमाळ विधानसभा मतदारसंघात सर्वेक्षणासाठी चार नावे निवडली गेली आहे. त्या प्रत्येकाच्या सर्व पैलूंचे सर्वेक्षण केले जाईल. अनेक इच्छुकांनी आपल्या गॉडफादर मार्फत आतापासूनच उमेदवारीसाठी लॉबिंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र ‘आधी सर्वेक्षणात नाव येऊ द्या, मग पाहू’ एवढाच शब्द नेत्यांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)