भाजपा जिल्हाध्यक्ष निवडीसाठी अल्टीमेटम
By admin | Published: February 8, 2016 02:29 AM2016-02-08T02:29:02+5:302016-02-08T02:29:02+5:30
भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीचे भिजत घोंगडे कायम असून आता चक्क वरिष्ठ स्तरावरून जिल्हाध्यक्ष निवडीसाठी १० फेब्रुवारीचा अल्टीमेटम दिला आहे.
१० फेब्रुवारी : चंद्रपूरवरून येणार निवडणूक निरीक्षक
यवतमाळ : भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीचे भिजत घोंगडे कायम असून आता चक्क वरिष्ठ स्तरावरून जिल्हाध्यक्ष निवडीसाठी १० फेब्रुवारीचा अल्टीमेटम दिला आहे. यासाठी चंद्रपूरवरून निवडणूक निरीक्षक येणार आहे. यामुळे इच्छुकांच्या मोर्बेबांधणीला वेग आला आहे.
जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत भाजपाने सर्वाधिक पाच जागा जिंकल्या. त्यानंतरही पाहिजे त्या प्रमाणात पक्ष बांधणी झाली नाही. अशा पार्श्वभूमीवर आता जिल्हाध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू आहे. गत महिनाभरापासून भाजपाच्या जिल्हा निवडीचे गुऱ्हाळ सुरू आहे. विदर्भात यवतमाळ, चंद्रपूर, बुलडाणा या तीन जिल्ह्यातीलच तिढा कायम असल्याने शेवटचा अल्टीमेटम देण्यात आला आहे. यवतमाळ जिल्ह्यात भाजपाचे प्रदेश संघठन महामंत्री आले असता त्यांच्यासमोर अनेकांनी पक्ष कार्यावर नाराजी व्यक्त केली. यात इच्छुकासोबतच विद्यमान जिल्हाध्यक्षांचे हितचिंतक असलेल्यांचाही समावेश होता. याशिवाय विधानसभा निवडणूक काळात पांढरकवड्यात एबी फॉर्मवर आलेली दोन नावे, दारव्हा व पुसद येथील उमेदवारी यावर आता संशय व्यक्त होत आहे. शिवाय विद्यमान जिल्हाध्यक्षांना असलेले वरिष्ठांचे पाठबळ सध्या सैल झाले आहे. त्यामुळे इच्छुकांच्या महत्वकांक्षा आणखीच वाढल्या आहे. अध्यक्ष निवडीसाठी अर्बन बँक निवडणुकीतील सक्रियताही महत्वाची ठरणार आहे. या निवडीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्णपणे नियंत्रण राहणार आहे. त्यामुळे भाजपासोबतच संघाकडूनही होकार मिळविण्यासाठी फिल्डींग लावली जात आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
हे आहेत इच्छुक
भाजपा जिल्हाध्यक्षासाठी माजी आमदार उत्तमराव इंगळे, मनोज इंगोले, अमर दिनकर, महादेव सुपारे, प्रवीण प्रजापती, राजू पडगीलवार या इच्छुकांकडून प्रयत्न केले जात आहे. याशिवाय विद्यमान जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे यांनीसुद्धा श्रेष्ठींपुढे विधानसभेतील यशाचा आलेख मांडत जिल्हाध्यक्षपद कायम ठेवण्यासाठी मनधरणी चालविली आहे.