भाजपा पहिल्यांदाच दोन आकड्यात
By admin | Published: February 24, 2017 02:33 AM2017-02-24T02:33:38+5:302017-02-24T02:33:38+5:30
यवतमाळ जिल्हा परिषदेच्या पाच दशकांवरील इतिहासात पहिल्यांदाच भाजपाला सदस्यांची दोन आकडी संख्या गाठता आली.
नेतृत्व पालकमंत्र्यांचे : वणी, राळेगावच्या आमदारांची साथ
यवतमाळ : यवतमाळ जिल्हा परिषदेच्या पाच दशकांवरील इतिहासात पहिल्यांदाच भाजपाला सदस्यांची दोन आकडी संख्या गाठता आली. गेल्या वेळी केवळ चार सदस्य संख्या असलेल्या भाजपाने यावेळी गरुड झेप घेत तब्बल १७ उमेदवार निवडून आणले.
पालकमंत्री मदन येरावार यांच्या नेतृत्वात भाजपा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या आखाड्यात उतरली होती. त्यांच्या दिमतीला चार आमदार असले तरी त्यातील उमरखेड व आर्णीचे आमदार आपले कसब दाखविण्यात फेल ठरल्याचे चित्र पहायला मिळत आहे. राळेगावचे आमदार प्रा.डॉ. अशोक उईके यांची कामगिरी सर्वात सरस ठरली. त्यांच्या या कामगिरीत आणि विशेषत: राळेगावात काँग्रेसमधील बंडखोरांचे योगदानही बरेच मोठे असल्याचे सांगितले जाते. वणीचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनीही आपली चमक दाखविली. मात्र त्यांना ती वणी, झरी पुरतीच मर्यादित ठेवता आली. मारेगावात त्यांच्या नेतृत्वाला काँग्रेसने आव्हान दिले.
जिल्हा परिषदेतील भाजपाला लाभलेल्या चौपट यशाच्या कामगिरीचे नेतृत्व पालकमंत्री म्हणून मदन येरावार यांनी केले आहे. या कामगिरीचे श्रेयही सेनापती म्हणून त्यांना दिले जात आहे. परंतु त्यांच्या यवतमाळ या विधानसभा मतदारसंघात मात्र शिवसेनेने भाजपाला सुरूंग लावल्याचे चित्र पहायला मिळते आहे. यवतमाळ मतदारसंघातील जिल्हा परिषदेच्या चार पैकी दोनच जागा भाजपाला जिंकता आल्या. अन्य दोन जागांवर शिवसेनेने कब्जा केला. लाडखेडची जागाही भाजपाला जिंकता आली नाही. तेथे शिवसेनेने भाजपाला आडवे केले.
लालदिवा, सोबतीला पालकमंत्रीपद असल्याने यवतमाळ विधानसभा मतदारसंघातील भाजपा कार्यकर्ते व नागरिकांना ना. येरावार यांच्याकडून एकतर्फी कामगिरीची अपेक्षा होती. मात्र शिवसेनेला मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने ही अपेक्षा फोल ठरली.
यवतमाळ पंचायत समितीमध्येसुद्धा आठ पैकी सर्वाधिक चार जागा सेनेने पटकावून भाजपापुढे आव्हान उभे केले आहे. गेल्या वेळी पेक्षा यवतमाळ मतदारसंघ व जिल्हा परिषदेत भाजपाची कामगिरी उत्कृष्ट ठरल्याचा दावा नेत्यांकडून केला जात असला तरी जिल्हाभर भाजपाची एकूणच असलेली राजकीय ताकद बघता हे श्रेय अर्धेच असल्याचे बोलले जाते. (जिल्हा प्रतिनिधी)