आर्णीच्या विकासकामांत भाजपा सरकारचा दुजाभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2018 10:30 PM2018-11-09T22:30:47+5:302018-11-09T22:31:35+5:30
पंतप्रधान पदाचे उमेदवार असताना नरेंद्र मोदींनी आर्णीत येऊन २१ आश्वासने दिली. त्यापैकी एकही पूर्ण केले नाही. उलट येथील एमआयडीसी, निम्न पैनगंगा प्रकल्प या कामांवर ‘काँग्रेसचे प्रकल्प’ म्हणून आता राज्य सरकार दुर्लक्ष करीत आहे, असा आरोप माजी मंत्री अॅड. शिवाजीराव मोघे यांच्या नेतृत्वातील काँग्रेसच्या शिष्टमंडळाने केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्णी : पंतप्रधान पदाचे उमेदवार असताना नरेंद्र मोदींनी आर्णीत येऊन २१ आश्वासने दिली. त्यापैकी एकही पूर्ण केले नाही. उलट येथील एमआयडीसी, निम्न पैनगंगा प्रकल्प या कामांवर ‘काँग्रेसचे प्रकल्प’ म्हणून आता राज्य सरकार दुर्लक्ष करीत आहे, असा आरोप माजी मंत्री अॅड. शिवाजीराव मोघे यांच्या नेतृत्वातील काँग्रेसच्या शिष्टमंडळाने केला. भाजपा सरकारच्या या दुजाभावाबाबत गुरुवारी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य तथा माजी खासदार विजय दर्डा यांना निवेदन देण्यात आले.
विजय दर्डा गुरूवारी उमरी पठारच्या वृद्धाश्रमातील कार्यक्रमासाठी आले असता काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन समस्यांचे निवेदन दिले. शिवाजीराव मोघे यांच्या नेतृत्वात काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेतली. यवतमाळ जिल्ह्यातील विशेषत: आर्णी तालुक्यातील अनेक प्रश्न निवेदनातून त्यांच्या निदर्शनास आणून दिले.
शासनाने काही तालुके दुष्काळग्रस्त घोषित केले. मात्र आर्णीसह उर्वरित तालुक्यांना टाळण्यात आल्याने असंतोष आहे. वीज भारनियमनाने रबी हंगामात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. त्यामुळे भारनियमन त्वरित बंद करावे, अशी समस्या निवेदनात मांडण्यात आली.
विशेष म्हणजे, शिवाजीराव मोघे मंत्री असताना त्यांनी आर्णी तालुक्यासाठी जवळा येथे एमआयडीसीसाठी प्रयत्न सुरू केले. जमीन अधिग्रहणाची महत्त्वाची प्रक्रियाही पार पाडली. मात्र आता भाजपा-शिवसेना युती शासनाने उद्योग व रोजगारासाठी अत्यंत उपयुक्त अशा या प्रकल्पाकडे पूर्णत: दुर्लक्ष केले आहे. काँग्रेस शासनाच्या काळात निम्न पैनगंगा प्रकल्पावर ३५० कोटी रुपये खर्च करण्यात आले. ७७६ हेक्टर जमीन अधिग्रहित करण्यात आली. लाखो हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्याची क्षमता असणाऱ्या या प्रकल्पाची प्रगती युती शासनाने पूर्णपणे थांबविली आहे. ‘काँग्रेसचा प्रकल्प’ म्हणून सरकार याकडे पाहते आहे, अशी खंत व्यक्त करण्यात आली. यावेळी विजय दर्डा यांच्या समवेत काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, लोकमत जिल्हा कार्यालय प्रमुख किशोर दर्डा उपस्थित होते. निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात अॅड. शिवाजीराव मोघे, आर्णीचे माजी नगराध्यक्ष आरिज बेग, बाळासाहेब शिंदे, दिग्विजय शिंदे, राजू विरखेडे, पंडित बुटले आदी उपस्थित होते.
नरेंद्र मोदींच्या ‘चाय पे चर्चा’ची पोलखोल
२०१४ च्या निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदी यांनी आर्णी तालुक्यातील दाभडी येथे ‘चाय पे चर्चा’ हा कार्यक्रम घेतला. त्यात शेतकऱ्यांना २१ आश्वासने दिली. त्यातील एकही पूर्ण केले नाही. त्यांच्या या फसव्या आश्वासनाची काँग्रेस गेली चार वर्षे ‘पोलखोल’ करीत आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य आणि यवतमाळ जिल्ह्याचे भूमिपूत्र या नात्याने दाभडीतील आश्वासनांची नरेंद्र मोदींना आठवण करून द्यावी, अशी अपेक्षा काँग्रेस कार्यकर्त्यांनी विजय दर्डा यांच्यापुढे व्यक्त केली.