भाजपातील निष्ठावान संतप्त
By admin | Published: February 8, 2017 12:26 AM2017-02-08T00:26:39+5:302017-02-08T00:26:39+5:30
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीमध्ये पक्षात नव्याने दाखल झालेल्या बहुतांश कार्यकर्त्यांनाच पक्षाने तिकीट
‘आयाराम’ ठरले वरचढ : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक
संतोष कुंडकर वणी
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीमध्ये पक्षात नव्याने दाखल झालेल्या बहुतांश कार्यकर्त्यांनाच पक्षाने तिकीट दिल्याने भाजपात अंतर्गत कलह माजला आहे. पक्षश्रेष्ठींच्या या धोरणामुळे निष्ठावान कार्यकर्ते चांगलेच दुखावले असून आम्ही काय आयुष्यभर सतरंज्याच उचलायच्या का, असा प्रश्न निष्ठावान कार्यकर्त्यांमधून विचारला जात आहे.
वणी तालुक्यातील घोन्सा गणातून भाजपातर्फे निवडणूक लढविण्यासाठी नऊ जण उत्सूक होते. त्यात इंदिरा सहकारी सुतगिरणीचे संचालक सुनिल मत्ते, घोन्साचे उपसरपंच अनिल साळवे, कोरंबी मारेगाव येथील संघाचे निष्ठावान कार्यकर्ते प्रमोद कोसारकर, दहेगाव येथील नंदू उलमाले, रासा येथील मोहन वरारकर यांच्यासह नऊजण शर्यतीत होते. यातील काहींना तर कामाला लागा असा आदेशही देण्यात आला होता. मात्र ऐनवेळी २ जानेवारीला भाजपात प्रवेश करणाऱ्या घोन्सा येथील महेश उराडे यांना पक्षाने तिकीट दिल्याने घोन्सा गणातील निष्ठावान कार्यकर्ते चांगलेच संतापले आहेत. उराडे यांच्या नावाला घोन्सा गणातील कार्यकर्त्यांकडून प्रखर विरोध आहे. मात्र हा विरोध झुगारून उराडेंना तिकीट बहाल केल्याच्या मुद्यावरून सोमवारी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवारांच्या निवासस्थानी चांगलेच रणकंदन माजले होते, अशी माहिती आहे. उराडे यांनी आपल्या तिकीटासाठी नागपुरातून ‘फिल्डिंग’ लावली. तेथून दबाव आल्याने आ.बोदकुरवारांना उराडेंना उमेदवारी द्यावी लागली, असे सांगण्यात येते. दरम्यान, घोन्सा गणातून भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढविण्यासाठी ईच्छूक होते, त्या नऊजणांपैैकी सात जणांची मंगळवारी गुप्त बैैठक झाली. या बैैठकीत काय निर्णय झाला, त्याचा तपशिल मात्र मिळू शकला नाही.
राजुर-चिखलगाव गटातही हाच प्रकार झाला. या गटातून भाजपातर्फे बाळा हिकरे व शंकर बोरगलवार हे उमेदवारीसाठी दावेदार होते. बाळा हिकरे यांची तिकीट फायनल झाली होती. मात्र अगदी नामांकन अर्ज दाखल करताना बाळा हिकरे यांच्या अर्जाला लावून असलेला पक्षाचा बी फॉर्म काढून तो संघदीप भगत यांच्या नामांकन अर्जाला जोडण्यात आला. संघदीप भगत हे राजूर (कॉलरी) ग्रामपंचायतीचे सदस्य असून त्यांनी बसपाच्या तिकीटावर ग्रामपंचायत निवडणूक लढविली होती. राजूर-चिखलगाव गटातील कार्यकर्तेही चांगलेच दुखावले आहेत. त्यातच बाळा हिकरे यांनीही अपक्ष उमेदवारी दाखल केल्याने या गटातील लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मारेगाव व झरी जामणी तालुक्यातही अनेक गट व गणात असाच प्रकार झाल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे आता निवडणुकीत हे असंतुष्ट कार्यकर्ते काय भूमिका घेतात, याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.