पंचायत पोटनिवडणुकीत भाजपाने राखला गड
By admin | Published: January 12, 2016 02:15 AM2016-01-12T02:15:03+5:302016-01-12T02:15:03+5:30
झरी पंचायत समितीच्या मुकुटबन गणासाठी रविवारी पोटनिवडणूक झाली.
सुरेश मानकर विजयी : शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर
मुकुटबन : झरी पंचायत समितीच्या मुकुटबन गणासाठी रविवारी पोटनिवडणूक झाली. सोमवारी मतमोजणीनंतर भाजपाचे उमेदवार सुरेश मानकर हे ९८१ मतांनी विजयी झाल्याचे घोषित करण्यात आले. आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या नेतृत्वात भाजपाने ही जागा कायम राखण्यात यश मिळविले.
भाजपाचे येथील विद्यमान सरपंच शंकर लाकडे यांनी राजीनामा दिल्यामुळे झरी पंचायत समितीच्या मुकुटबन गणासाठी रविवारी पोटनिवडणूक झाली. भाजपातर्फे सुरेश मानकर, शिवसेनेतर्फे संदीप विंचू, काँग्रेसतर्फे करमचंद बघेले, तर राष्ट्रवादीतर्फे डॉ.नेताजी पारशिवे यांनी पोटनिवडणूक लढविली. या निवडणुकीसाठी प्रचाराचा कालावधी अगदी कमी असल्याने उमेदवारांना मतदारांपर्यंत पोहोचता आले नाही.
ही जागा पूर्वी भाजपाकडेच होती. सध्या केंद्र व राज्यात भाजपाची सत्ता असल्यामुळे जनतेने पुन्हा एकदा भाजपाच्या सुरेश मानकर यांना निवडून दिले. मतमोजणीत एकूण १७ केंद्रांतून सलग पाचही फेरीत भाजपा उमेदवार आघाडीवर होता. त्यांनी शिवसेना व काँग्रेसचे समीकरण बिघडविले.
भाजपाचे सुरेश मानकर यांना तीन हजार ३१५, शिवसेनेचे संदीप विंचू यांना दोन हजार ३३४, काँगे्रसचे करमचंद बघेले यांना दोन हजार १०३, तर राष्ट्रवादीच्या डॉ.नेताजी पारशिवे यांना केवळ ४९६ मतांवर समाधान मानावे लागले. भाजपाचे मानकर यांनी शिवसेनेचे विंचू यांच्यापेक्षा ९८१ मतांची आघाडी घेऊन विजय संपादन केला. आमदार संजीवरेड्डी बोदुकरवार यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. त्यांच्या नेतृत्वात झरी नगरपंचायतीनंतर भाजपाने पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीतही बाजी मारली. त्यामुळे भाजपाला आपला गड कायम राखता आला आहे. या निवडणुकीत शिवसेना दुसऱ्या, काँग्रेस तिसऱ्या, तर राष्ट्रवादीचे उमेदवार चौथ्या स्थानावर राहिले. निकाल घोषित झाल्यानंतर फटाक्यांची आतिषबाजी करीत विजयी मिरवणूक काढण्यात आली. (शहर प्रतिनिधी)