दारव्हा येथे भाजपाचा मेळावा
By admin | Published: January 21, 2017 01:28 AM2017-01-21T01:28:23+5:302017-01-21T01:28:23+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लोकाभिमुख निर्णय, जनविकासाच्या ध्यासामुळे,
दारव्हा : पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लोकाभिमुख निर्णय, जनविकासाच्या ध्यासामुळे, येत्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीला कार्यकर्त्यांनी आत्मविश्वासाने सामोरे जावे, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले. ते दारव्हा येथे शुक्रवारी आयोजित भाजपा कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.
ते पुढे म्हणाले, प्रामाणिक माणूसच कठोर निर्णय घेऊ शकतो. त्यानुसार मोदी यांनी नोटबंदीचा कठोर निर्णय घेतल्याने देशात दडलेला काळा पैसा बाहेर आला. हा पैसा विकास कामांवर खर्च केला जाणार आहे. केंद्र व राज्य सरकारने जनतेच्या हिताच्या अनेक योजना सुरू केल्या. त्या जनतेपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांवर आहे. निवडणुकीसाठी आपले लक्ष स्पष्ट असून त्याला मेहनतीची जोड दिल्यास जिल्हा परिषद व पंचायत समितीत सत्ता असेल, असे त्यांनी सांगितले.
पक्षाचा केवळ जाहिरनामा नसून तो वचननामा आहे. कार्यकर्त्यांनी जनतेशी नम्रपणे वागून गल्लीतील राजकारणाची गुंज आता दिल्लीत पोहोचवावी, असे आवाहन त्यांनी केले. या मेळाव्यात माजी जिल्हा परिषद सदस्य संतोष चव्हाण यांनी कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश घेतला. मंचावर जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे, माजी आमदार उत्तमराव इंगळे, तालुकाध्यक्ष दत्तात्रय राहणे, माजी सभापती नीलेश भारती, नगरपरिषद उपाध्यक्ष प्रिती राहुल बलखंडे, डॉ. दिलीप जामनकर, धनंजय बलखंडे, सचिन जाधव, रवी अस्वार, मधुसूदन लोहकरे, नाना सावळे, नगरसेवक दामोदर लढ्ढा, शुभम गवई, सुनिता ठाकरे, मिरा कराळे, यादव पवार, पंजाब जाधव, सुभाष दायमा, गजानन गुल्हाने, घनश्याम वानखडे उपस्थित होते.( तालुकाप्रतिनिधी)