दिग्रसमध्ये भाजपा-सेनेचा राडा; काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2019 09:44 PM2019-02-24T21:44:48+5:302019-02-24T21:45:27+5:30
भाजपा-शिवेसेनेचे पक्षश्रेष्ठी युती करून निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी सज्ज झालेले असताना, दिग्रसमध्ये मात्र या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी एकमेकांविरुद्ध प्रचंड राडेबाजी केली.
दिग्रस (यवतमाळ): भाजपा-शिवेसेनेचे पक्षश्रेष्ठी युती करून निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी सज्ज झालेले असताना, दिग्रसमध्ये मात्र या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी एकमेकांविरुद्ध प्रचंड राडेबाजी केली. पुलाच्या लोकार्पणावरून चक्क सेनेचे महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्यासमक्ष हा राडा झाला. राठोड यांना भाजपा कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवून घोषणाबाजीही केल्याने तणाव निर्माण झाला होता.
दिग्रस-पुसद मार्गावरील बहुप्रतीक्षित पुलाचे बांधकाम नुकतेच पूर्ण झाले. त्याच्या लोकार्पण सोहळ्याच्या पत्रिका शहरात वाटण्यास सुरुवात होताच राजकीय पुढा-यांमध्ये कुजबूज सुरू झाली. कारण पत्रिकेवर ना. सजंय राठोड यांच्या व्यतिरिक्त पालकमंत्री मदन येरावार, खासदार भावना गवळी व दिग्रसच्या नगराध्यक्ष सदफजहा जावेद पहेलवान यांच्यापैकी कोणाचीच नावे नव्हती. एवढेच नव्हेतर ‘विनित’ म्हणूनही सार्वजनिक बांधकाम विभागाऐवजी शिवसेना व शिवसेनेच्या इतर शाखांची नावे होती. त्यामुळे हा पूल शासकीय निधीतून झाला की शिवसेनेने बांधला, असा प्रश्न करत नगराध्यक्षासह विरोधी नगरसेवकांनी सायंकाळी शंकर टॉकीजसमोर प्रचंड राडा केला.
ना. संजय राठोड येताच त्यांचे वाहन थांबविण्याचा प्रयत्न करण्यात आला. काळे झेंडे दाखवत त्यांच्या व शिवसेनेच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. शिवसेना व भाजपाचे कार्यकर्ते समोरासमोर आल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला, अशी चर्चा आहे. ना. राठोड यांना ठरल्यानुसार शहीद भगतसिंग यांच्या पुतळ्याचे पूजन करायचे होते. पण या राड्यामुळे त्यांना थेट लोकार्पण सोहळ्याकड़े जावे लागले.
नगराध्यक्ष सदफजहा, माजी नगराध्यक्ष व भाजपचे शहराध्यक्ष रवींद्र अरगडे, विविध कार्यकारी संस्थेचे सभापती बाबूसिंग जाधव, नगरसेवक जावेद पहेलवान, रुस्तम पप्पूवाले, सैयद अकरम, भाजपचे बबलू ओसवाल, प्रज्योत अरगडे, विजय सरदार, साहील जयसवाल, मनीष मुनी, विजय अंबुरे, शिल्पा खंडारे, डॉ. अजय शिंदे, प्रशांत गौरकर, हरीश सांखला यांच्यासह माजी मंत्री संजय देशमुख यांचे समर्थक व भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
नेत्यांची युती, कार्यकर्त्यांचे काय?
भाजपा-सेनेत नुकतीच राष्ट्रीय स्तरावर युती झाली. मात्र, दिग्रसमध्ये युतीच्या घोषणेच्या दुस-याच दिवशी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. ते पाहता, ही फक्त नेत्यांमधील युती असून जोपर्यंत कार्यकर्त्यांची दिलजमाई होत नाही, तोपर्यंत युतीचे देऊळ पाण्यातच राहणार असल्याचे दिसते.