वणी तालुक्यात भाजपा-सेनेचा वरचष्मा
By admin | Published: February 24, 2017 02:36 AM2017-02-24T02:36:45+5:302017-02-24T02:36:45+5:30
जिल्हा परिषद-पंचायत समितीच्या निवडणुकीत तालुक्यातील भाजपा-शिवसेनेचा वरचष्मा राहिला आहे,
काँग्रेसचा सफाया : तीन गटात भाजपाची मुसंडी, एक गट शिवसेनेच्या ताब्यात, कार्यकर्त्यांचा जल्लोष
संतोष कुंडकर/ विनोद ताजने वणी
जिल्हा परिषद-पंचायत समितीच्या निवडणुकीत तालुक्यातील भाजपा-शिवसेनेचा वरचष्मा राहिला आहे, तर काँग्रेसला एकही जागा न मिळाल्याने तालुक्यातून काँग्रेसचा सफाया झाला. जिल्हा परिषदेच्या चार जागांपैकी तीन जागा भाजपाला, तर एक जागा शिवसेनेला मिळाली. मागील वेळेपक्षा भाजपाला दोन जागेचा फायदा, तर सेनेला एका जागेचे नुकसान झाले.
पंचायत समिती गणात आठ जागांपैकी चार जागा भाजपाला, तीन शिवसेनेला तर एक जागा भाकपाला मिळाली. त्यामुळे पंचायत समिती सभापतीची चाबी आता भाकपकडे आली आहे.
येथील शासकीय गोदामात गुरूवारी सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरूवात झाली. दुपारी १२.३० वाजता सर्व निकाल हाती आलेत. जिल्हा परिषदेच्या गटांमध्ये शिरपूर-शिंदोला गटातून शिवसेनेचे परसाराम पेंदोर यांनी भाजपाच्या राजू सांबशिव गेडाम यांचा १५७६ मतांनी पराभव केला. घोन्सा-कायर गटात भाजपाच्या मंगला पावडे यांनी काँग्रेसच्या वंदना आवारी यांचा १६१६ मतांनी पराभव केला. चिखलगाव-राजूर गटात भाजपाचे संघदीप भगत यांनी काँग्रेसचे डॅनी सँड्रावार यांचा ८६८ मतांनी पराभव केला, तर लालगुडा-लाठी गटात भाजपाचे बंडू चांदेकर यांचा केवळ ५१९ मतांनी विजय झाला. शिवसेनेचे डॉ.गजानन मेश्राम हे अखेरच्या तीन मतयंत्रात माघारले. त्यामुळे त्यांना पराभव पत्करावा लागला.
राष्ट्रवादीने या गटात एकमेव जागा लढविली होती. राष्ट्रवादीचे उमेदवार स्वप्नील धुर्वे यांना केवळ ५१७ मते मिळाली. पंचायत समितीच्या गटात कायर, घोन्सा, राजूर, चिखलगाव हे चार गणात भाजपाने बाजी मारली. लाठी, शिरपूर व शिंदोला गण शिवसेनेच्या ताब्यात गेले, तर लालगुडा गणात भाकपच्या चंद्रज्योती शेंडे यांचा केवळ ५० मतांनी विजय झाला. चिखलगाव गणात भाजपाचे संजय पिंपळशेंडे यांचा ७९५ मतांनी विजय झाला. काँग्रेसचे अमोल रांगणकर दुसऱ्या स्थानावर, तर शिवसेनेचे तेजराज बोढे तिसऱ्या स्थानावर राहिले. राजूर गणात भाजपाच्या शिला कोडापे यांनी अपक्ष उमेदवार विद्या पेरकावार यांचा ७०८ मतांनी पराभव केला. सर्वांचे लक्ष लागून असलेल्या लाठी गणात भाजपाच्या उमा पिदुरकर यांचा ४७९ मतांनी पराभव झाला. येथे शिवसेनेचे टिकाराम खाडे हे वियजी झाले.
शिरपूर गणातून शिवसेनेच्या वर्षा मोरोपंत पोतराजे त्यांनी काँग्रेसच्या प्रतिभा येरगुडे यांचा २५३ मतांनी पराभव केला. घोन्सा गणात भाजपाच्या महेश उराडे यांनी शिवसेनेच्या प्रदीप निखाडे यांचा १०७३ मतांनी पराभव केला. कायर गणात भाजपाच्या लिशा गजानन विधाते यांनी सेनेच्या रजनी टोंगे यांचा ७४४ मतांनी पराभव केला. शिंदोला गणाकडेही जनतेचे लक्ष लागले होते. या गणातून शिवसेनेचे संजय निखाडे यांनी भाजपाचे शांतीलाल जैन यांचा १०६७ मतांनी पराभव केला.
वणी येथील शासकीय गोडाऊनमध्ये मतमोजणी पार पडली. यावेळी पोलिसांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. निकाल ऐकण्यासाठी टिळक चौैक व तहसील परिसरात ग्रामीण भागातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.