काँग्रेस आमदाराच्या सभेत भाजपा-सेनेचा हंगामा

By admin | Published: July 25, 2014 12:03 AM2014-07-25T00:03:51+5:302014-07-25T00:03:51+5:30

काँग्रेसचे आमदार तथा विधानसभा उपाध्यक्ष वसंत पुरके यांच्या अध्यक्षतेत सुरू असलेल्या सभेत शिवसेना व भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी चांगलाच हंगामा केला. खासदारांना या सभेसाठी आमंत्रित

BJP-Shiv Sena ruckus in Congress meeting | काँग्रेस आमदाराच्या सभेत भाजपा-सेनेचा हंगामा

काँग्रेस आमदाराच्या सभेत भाजपा-सेनेचा हंगामा

Next

राळेगाव : काँग्रेसचे आमदार तथा विधानसभा उपाध्यक्ष वसंत पुरके यांच्या अध्यक्षतेत सुरू असलेल्या सभेत शिवसेना व भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी चांगलाच हंगामा केला. खासदारांना या सभेसाठी आमंत्रित का केले नाही, असा जाब विचारुन सभागृह दणाणून सोडले. राळेगाव येथे घडलेल्या या प्रकाराने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
पंचायत समितीच्यावतीने येथील वसंत सहकारी जिनिंग प्रेसिंगच्या सभागृहात इंदिरा आवास योजनेसंदर्भात सभा घेण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी विधान परिषदेचे उपाध्यक्ष आमदार वसंतराव पुरके होते. सभा सुरू होताच इंदिरा आवास योजनेअंतर्गत केंद्राचा ७५ टक्के तर राज्याचा २५ टक्के वाटा असताना केंद्रात प्रतिनिधीत्व करणाऱ्या खासदार भावना गवळी यांना गटविकास अधिकारी विनोद खेडकर यांनी का बोलाविले नाही, असा सवाल भाजपा-सेना पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला. काही वेळातच भाजपाचे तालुकाध्यक्ष अनिल जवादे, सेनेचे उपतालुका प्रमुख मनोज भोयर यांनी माईकचा ताबा घेतला. काही कार्यकर्त्यांची गटविकास अधिकाऱ्यांशी झटापट झाली. स्टेजवर उपस्थित आमदार पुरके, अरविंद वाढोणकर, पंचायत समिती सभापती अशोक केवटे यांनी समजूत घालण्याचा प्रयत्न केला. शेवटी निषेध व्यक्त करून युतीचे कार्यकर्ते बाहेर पडले. दरम्यान स्टेजवर चढण्यापासून वादविवादापासून रोखण्यास पोलिसांना चांगलीच कसरत करावी लागली. ठाणेदार डी.पी.डोंगरदिवे व त्यांच्या सहकाऱ्यांना आपली शक्तीपणास लावावी लागली. मध्यंतरी काही उत्साही लाभार्थी स्टेजवर चढून खाली बसलेल्या इतर उपस्थितांना स्टेजवर येण्याचा इशारा करू लागले. त्यामुळे परिस्थिती आणखी कोणते वळण घेणे, अशी परिस्थिती निर्माण झाली होती.
सायंकाळी भाजपा कार्यालयात युतीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात भूमिका मांडली. गटविकास अधिकाऱ्यांनी केवळ आमदार पुरके यांच्यासाठी या मेळाव्याचे आयोजन केले होते. काल वेळेवर आवाज उठविला म्हणून निमंत्रण देण्याचा सोपस्कार पार पाडला, असा आरोप करण्यात आला. कार्यशाळांंना केवळ अधिकारी मार्गदर्शन करण्याचा प्रघात आहे. मात्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आ.पुरकेंना का व कसे बोलाविण्यात आले, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. पत्रकार परिषदेत गटविकास अधिकाऱ्यांच्या भूमिकेचा निषेध करून कारवाईची मागणी करण्यात आली. पत्रपरिषदेला अ‍ॅड. प्रफुल्ल चव्हाण, अनिल जवादे, सुरेश पोटदुखे, राकेश राऊळकर, मनोज भोयर आदी उपस्थित होते.
गटविकास अधिकारी विनोद खेडकर यांच्याशी संपर्क साधला असता, कार्यशाळेच्या कार्यक्रमाचे आयोजन दरवेळी पंचायत समिती स्तरावर सभापती व सदस्यांच्या उपस्थितीत आयोजन केले जात असल्याचे सांगितले. आमदार पुरके यापूर्वीसुद्धा काही कार्यशाळेला मार्गदर्शन करण्याकरिता आले होते. या कार्यक्रमात ३५ हजार रुपयांचा पहिला हप्ता धनादेशाद्वारे देण्याचा कोणताच कार्यक्रम नियोजित नव्हता. लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याचे धोरण असल्याचे त्यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: BJP-Shiv Sena ruckus in Congress meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.