जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी भाजपाचा सर्वे

By admin | Published: January 5, 2017 12:10 AM2017-01-05T00:10:16+5:302017-01-05T00:10:16+5:30

आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी जिल्हाभरातून एक हजार ६२ इच्छुकांनी उमेदवारी मिळावी म्हणून भाजपाकडे अर्ज सादर केले आहेत.

BJP survey for Zilla Parishad, Panchayat Samiti | जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी भाजपाचा सर्वे

जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी भाजपाचा सर्वे

Next

खासगी एजन्सीला जबाबदारी : उमेदवारीसाठी १०६२ इच्छुकांचे अर्ज, नव्या चेहऱ्यांचाही शोध सुरू

राजेश निस्ताने  यवतमाळ
आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी जिल्हाभरातून एक हजार ६२ इच्छुकांनी उमेदवारी मिळावी म्हणून भाजपाकडे अर्ज सादर केले आहेत. मात्र भाजपाने ‘वास्तव’ जाणून घेण्यासाठी या सर्व अर्जांचे खासगी कंपनीमार्फत सर्वेक्षण सुरू केले आहे. या अर्जाशिवाय वेगळे नाव शोधण्याच्या सूचनाही या सर्वेक्षकांना पक्षातर्फे देण्यात आल्या आहेत.
जिल्हा परिषद व १६ पंचायत समित्यांच्या निवडणुकीची सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी चालविली आहे. त्यात सत्ताधारी भाजपाला सर्वाधिक प्रतिसाद मिळतो आहे. शिवसेनेनेही ग्रामीण भागात चांगले पाय रोवले असल्याने अनेकांनी सेनेची उमेदवारी मिळविण्यासाठी मोर्चेबांधणी चालविली आहे. परंतू मोदी लाट कायम असल्याने भाजपाच्या उमेदवारीला पहिला पसंतीक्रम दिला जात आहे. त्यातच जिल्ह्यात भाजपाचे केंद्रीय गृहराज्यमंत्री, पालकमंत्री, पाच आमदार असल्याने आणि आता नगरपरिषद निवडणुकीत भाजपाची सरशी झाल्याने चांगले वातावरण निर्माण झाले आहे. त्याचा लाभ मिळविण्याचा प्रयत्न इच्छुकांकडून होतो आहे.
जिल्हा परिषदेच्या ६२ जागांसाठी (सर्कल) भाजपाकडे ३२२ इच्छुकांनी उमेदवारीसाठी अर्ज केले आहेत. त्यात काही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित चेहऱ्यांचाही समावेश आहे. पक्षाचे निष्ठावंत व सामान्य कार्यकर्ते तसेच पक्षात नव्याने दाखल झालेल्या इच्छुकांनीही उमेदवारी मिळावी म्हणून अर्ज केले आहेत. सर्वच तालुक्यात कमी-अधिक प्रमाणात सारखे अर्ज आले आहेत. खुला प्रवर्ग आणि नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी असलेल्या सर्कलमध्ये सर्वाधिक गर्दी पहायला मिळते. त्याच वेळी अनुसूचित जाती, जमातीसाठी आरक्षित सर्कलमध्ये इच्छुकांची संख्या कमी असल्याचे सांगितले जाते. १६ पंचायत समित्यांसाठी ७४० इच्छुकांनी उमेदवारी मिळावी म्हणून भाजपाकडे अर्ज केले आहे. एवढ्या मोठ्या संख्येने अर्ज आल्याने नेमकी कुणाला उमेदवारी द्यावी, याचा पेच नेत्यांपुढे निर्माण झाला आहे. हा पेच सोडविण्यासाठी भाजपाने सर्वेक्षणाचा मार्ग निवडला आहे. नागपुरातील एका प्रसिद्ध खासगी एजंसीला सर्वेक्षणाचे हे काम सोपविण्यात आले आहे. २९ डिसेंबर २०१६ पासून हे सर्वेक्षण सुरू झाले. भाजपाला जिल्हा परिषदेसाठी प्राप्त ३२२ आणि पंचायत समितीसाठी प्राप्त ७४० अर्ज या सर्वेक्षकांना देण्यात आले आहे. हे सर्वेक्षक छुप्या पद्धतीने आपली मोहीम राबवित आहेत. त्या-त्या सर्कलमधील अनेक गावांना भेटी देणे, समाजातील सर्वच स्तराच्या लोकांची अर्जदार इच्छुकाबाबत मते जाणून घेणे, त्यांचे ‘प्लस-मायनस’ मुद्दे तपासणे, अर्जदाराचे एकूणच चारित्र्य, सामाजिक कार्य, पक्षासाठी योगदान, उपयोगिता आदी पैलू तपासले जाणार आहेत. याशिवाय अर्ज न केलेला परंतु चांगली प्रतिमा असलेला चेहरा कुणी आहे का याचाही शोध या सर्वेक्षकांमार्फत घेतला जाणार आहे. या सर्वेक्षणातील निष्कर्षावर अनेकांचे जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक भाजपाच्या तिकिटावर लढविण्याचे गणित अवलंबून राहणार आहे.

नेत्यांच्या गटबाजीनंतरही काँग्रेसला उत्स्फूर्त प्रतिसाद
सलग पाच निवडणुकांमध्ये पराभवाचा सामना करावा लागल्याने काँग्रेस कोमात गेल्याचे बोलले जात असले तरी प्रत्यक्षात ग्रामीण भागात मात्र जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे उमेदवारीसाठी प्राप्त अर्जांवरून स्पष्ट होते आहे. जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयातून जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी सुमारे ७०० अर्जांची उचल करण्यात आली होती. त्यातून साडेपाचशेवर अर्ज जिल्हा कार्यालयाला प्राप्त झाले आहे. त्यात जिल्हा परिषदेसाठीच्या २०० तर पंचायत समितीसाठीच्या ३५० अर्जांचा समावेश आहे. गेल्या पंचवार्षिक पेक्षाही यावेळी ग्रामीण भागात काँग्रेसची उमेदवारी मिळविण्यासाठी अधिक प्रतिसाद मिळत असल्याचे जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयातून ‘लोकमत’ला सांगण्यात आले. नरेंद्र मोदी सरकारने जाहीर केलेली नोटाबंदी आणि त्यानंतर गेल्या ५० दिवसांपासून समाजातील सामान्य नागरिकांना सोसावा लागणारा त्रास, ३१ डिसेंबरला मोदींनी अवघ्या १६० दिवसांचे व्याज माफ करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पुसलेली पाने आदी कारणांमुळे सत्ताधारी भाजपा-शिवसेना विरोधात ग्रामीण जनतेत प्रचंड रोष आहे. त्यातूनच नागरिकांचा काँग्रेसकडे कल वाढल्याचा दावा काँग्रेसकडून केला जात आहे. म्हणूनच साडेपाचशे पेक्षा अधिक इच्छुकांनी काँग्रेसची उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्न चालविले असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. पांढरकवडा तालुक्यातील पाटणबोरी आणि यवतमाळ तालुक्यातील आसोला सर्कलमध्ये इच्छुकांनी काँग्रेसच्या उमेदवारीसाठी सर्वाधिक गर्दी केली आहे. तर तिकडे पुसद विभागात तेवढा ‘रिस्पॉन्स’ नाही. तेथे विजय खेचून आणतील अशा इच्छुकांचा शोध घेण्याची वेळ काँग्रेसवर आली असल्याचे सांगण्यात येते.
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून जिल्हाध्यक्ष निवडीवरून नेत्यांमधील गटबाजी उफाळून आली आहे. हा वाद मुंबईच नव्हे तर दिल्लीपर्यंत गेला आहे. कार्यकर्त्यांना एकजुटीचा संदेश देणारे नेतेच आपसात भांडत असल्याने काँग्रेसची शकले पडल्याचे चित्र आहे. असे असतानाही ग्रामीण भागात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांसाठी प्रचंड उत्साह पहायला मिळतो आहे. पक्षाची उमेदवारी मिळविण्यासाठीही रस्सीखेच सुरू असल्याचे चित्र आहे. गटबाजीला कारणीभूत ठरलेला जिल्हाध्यक्ष पदाचा मुद्दा अद्याप निकाली निघालेला नाही. तीन नावे दिली पण अद्याप एकाही नावावर एकमत होऊ शकलेले नाही. आता अपेक्षेनुसार मावळते जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार वामनराव कासावार यांच्याकडेच जिल्हा परिषद निवडणुकीपर्यंत अध्यक्ष पदाची धुरा राहण्याची चिन्हे दिसू लागली आहे. या निवडणुकीनंतर जिल्हाध्यक्ष पदाबाबत फारसे कुणी विचारणार नाही. त्यामुळे पुढेही आणखी काही महिने कासावारांकडेच जिल्हा काँग्रेसची धुरा राहण्याची शक्यता राजकीय गोटात वर्तविली जात आहे.

 

Web Title: BJP survey for Zilla Parishad, Panchayat Samiti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.