पालकमंत्र्यांच्या शोधात निघाली भाजपा
By admin | Published: July 9, 2014 11:53 PM2014-07-09T23:53:01+5:302014-07-09T23:53:01+5:30
पाच वर्षांपासून यवतमाळ जिल्हा नैसर्गिक आपत्तीचा सामना करीत आहे. या स्थितीत जिल्ह्याचे पालकत्व स्विकारणारे पालकमंत्री मात्र जिल्ह्यात फिरकायला तयार नाही. आता भाजपाने पालकमंत्र्यांसाठी
शेतकरी संतापले : आपण यांना पाहिलंत का ?
यवतमाळ : पाच वर्षांपासून यवतमाळ जिल्हा नैसर्गिक आपत्तीचा सामना करीत आहे. या स्थितीत जिल्ह्याचे पालकत्व स्विकारणारे पालकमंत्री मात्र जिल्ह्यात फिरकायला तयार नाही. आता भाजपाने पालकमंत्र्यांसाठी चक्क शोध मोहीम हाती घेतली आहे. ‘आपण यांना पाहिलत काय’ अशा आशयाचे पालकमंत्र्यांच्या छायाचित्रासह पत्रकच वितरित करणे सुरू केले आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून राज्याचे रोजगार हमी आणि जलसंधारण मंत्री डॉ.नितीन राऊत यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. जिल्हा बिकट अवस्थेतून जात आहे. या स्थितीत संकटावर मात करण्याची जबाबदारी पालकमंत्र्यांची आहे. अशा स्थितीत दुष्काळग्रस्तांना धीर देण्यासाठी पालकमंत्री आलेच नाही. त्यामुळे भाजपाने त्यांचा शोध सुरू केला आहे. त्यांचा शोध घेण्यासाठी एक निवेदन जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आले. पालकमंत्री दिसल्यास भाजपा कार्यालयात कळविण्याची सूचना निवेदनात करण्यात आली आहे. यासोबत दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासोबत शेतकऱ्यांना सर्वेक्षण करून आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी भाजपाचे तालुका अध्यक्ष दिनेश चिंडाले, बाळासाहेब शिंदे, अमर दिनकर, जुगल तिवारी, मुन्ना मिश्रा यांच्यासह अनेकजण उपस्थित होते. (शहर वार्ताहर)