शिंदे गटाच्या ताब्यातील मतदारसंघावर भाजपचा डोळा; लोकसभा मतदारसंघही रडारवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2022 02:30 PM2022-11-22T14:30:45+5:302022-11-22T14:56:36+5:30

चित्रा वाघ यांच्या पत्रकार परिषदेनंतर संजय राठोड यांच्या विषयाला पुन्हा फुटले तोंड

BJP's eye on Shinde faction-held constituency; | शिंदे गटाच्या ताब्यातील मतदारसंघावर भाजपचा डोळा; लोकसभा मतदारसंघही रडारवर

शिंदे गटाच्या ताब्यातील मतदारसंघावर भाजपचा डोळा; लोकसभा मतदारसंघही रडारवर

googlenewsNext

विशाल सोनटक्के

यवतमाळ : यवतमाळ येथील पत्रकार परिषदेत मंत्री संजय राठोड यांच्या अनुषंगाने प्रश्न उपस्थित होणार हे अपेक्षित होते. मात्र, या प्रश्नावर भाजपच्या चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद अर्धवट सोडत एक प्रकारे संजय राठोड यांचा विषय राज्यस्तरावर नेला. आता शिवसेनेच्या महाप्रबोधन यात्रेत या विषयावरून शिंदे गटाला लक्ष्य केले जात आहे. दुसरीकडे शतप्रतिशत भाजपचा नारा देत, राज्यातील १६ लोकसभा मतदारसंघांतही भाजपने मोर्चेबांधणी सुरू केल्याने येणाऱ्या काळात अस्तित्व टिकविण्यासाठी शिंदे गटाला भाजपसोबतच संघर्ष करावा लागण्याची चिन्हे आहेत.

सेनेत बंडाळी करून बाहेर पडलेल्या शिंदे गटाने भाजपसोबत जात राज्यात सत्तेचा गड काबीज केला असला तरी पक्ष विस्तारासाठी येणाऱ्या काळात भाजप शिंदे गटाचा बळी देणार की काय, अशी चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय आमदार प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातील ओवळा-माजीवडासह तीन विधानसभा मतदारसंघांवर भाजपचा डोळा असल्याचे राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी नुकतेच म्हटले होते. सरनाईक यांनीही भाजपच्या कार्यपद्धतीबाबत उघड नाराजी व्यक्त केली होती. याच सत्तासंघर्षाचा दुसरा भाग अमरावती जिल्ह्यात बच्चू कडू आणि रवी राणा यांंच्या आरोप - प्रत्यारोपातून पुढे आला.

प्रहार संघटनेचे बच्चू कडू यांंना भाजपचे मित्र रवी राणा यांनी टार्गेट केले होते. या दोघांचीही भाषा तलवार आणि कोथळा काढण्यापर्यंत गेली होती. शेवटी बच्चू कडू यांनी ५० आमदारांना खोके दिले का, हे देवेंद्र फडणवीस यांनीच स्पष्ट करावे, असे म्हटल्यानंतर मध्यस्थी करून हा वाद मिटविण्यात आला. या वादालाही पक्ष विस्तार संघर्षाची किनार होती.

याच संघर्षाचा पुढचा एपिसोड यवतमाळमध्ये रंगला. मंत्री संजय राठोड आणि पूजा चव्हाण प्रकरणाशी संबंधित प्रश्न पत्रकार परिषदेत उपस्थित झाल्यानंतर भाजप महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी खरेतर या अपेक्षित प्रश्नाला संयमाने सामोरे जाणे अपेक्षित होते. मात्र, पत्रकारांवरच आरोप करीत त्यांनी संजय राठोड हेच या प्रकरणातील गुन्हेगार असल्याचा पुनरुच्चार केला. त्यानंतर अनेक ठिकाणी झालेल्या पत्रकार परिषदांमध्ये याच विषयावरून वादंग सुरू झाले.

वर्धा, नांदेडमध्ये तर पत्रकारांनी वाघ यांच्या पत्रकार परिषदेवरच बहिष्काराचे अस्त्र डागल्याने संजय राठोड यांंच्या विषयास पुन्हा नव्याने तोंड फुटले. सध्या सुरू असलेल्या शिवसेनेच्या महाप्रबोधन यात्रेत उपनेत्या सुषमा अंधारे या विषयावरून आता राठोड यांच्यासह शिंदे गटाची कोंडी करू लागल्या आहेत. ‘शतप्रतिशत भाजप’ अशी जाहीर भूमिकाच घेतलेली असल्याने भाजप पक्ष विस्तारासाठी प्रयत्न करणार, यात नवीन काही नाही. मात्र, हा विस्तार करताना भाजपच्या अजेंड्यावर शिंदे गटातीलच मतदारसंघ येत असल्याने येणाऱ्या काळात शिंदे गटाला स्वत:चे अस्तित्व टिकविण्यासाठी भाजपबरोबरच संघर्ष करावा लागण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तविली जात आहे.

लोकसभा मतदारसंघही भाजपच्या निशाण्यावर

भाजपने विरोधकांच्या ताब्यात असलेल्या राज्यातील १६ लोकसभा मतदारसंघांवरही लक्ष केंद्रित केले आहे. या मतदारसंघासाठी खास केंद्रीय मंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे मंत्री प्रत्येक मतदारसंघात प्रत्येकी तीन दिवसांच्या मुक्कामासाठी सहा वेळा जाऊन पक्षीय बांधणीवर लक्ष देत आहेत. महत्त्वाचे म्हणजे या १६ पैकी ११ मतदारसंघ पूर्वीच्या शिवसेनेकडे होते. चार राष्ट्रवादीकडे तर एक मतदारसंघ एमआयएमकडे आहे.

यातील शिंदे समर्थक खासदार प्रताप जाधव यांच्या ताब्यात असलेल्या बुलढाणा लोकसभा मतदारसंघात पक्ष विस्तारासाठी भाजपने केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, शिंदे गटातीलच खासदार सदाशिव लोखंडे यांच्या शिर्डी लोकसभा मतदारसंघात केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद पटेल, शिंदे गटातीलच हेमंत पाटील यांच्या हिंगोली लोकसभा मतदारसंघात केंद्रीय राज्यमंत्री शंतनू ठाकूर आदींची नियुक्ती करीत ही जागा जिंकण्यासाठी भाजपने मिशन-२०२४ अंतर्गत माेर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यामुळे शिंदे गटातील खासदारांची येणाऱ्या काळातील राजकीय लढाई वाटते तितकी सोपी असणार नाही. भावना गवळी यांनी सलग चार वेळा वाशिम-यवतमाळ मतदारसंघावर विजयाचा झेंडा फडकविला आहे. मात्र, राज्यातील सध्याची बदलती राजकीय समीकरणे पाहता त्यांनाही पुढील राजकीय वाटचालीत अडचणींचा सामना करावा लागण्याची चिन्हे आहेत.

पालकमंत्री संजय राठोड यांच्यावर भाजपकडून ठरवून तर निशाणा नाही ना?

भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्या पत्रकार परिषदेनं- तरच राज्यभर पुन्हा संजय राठोड यांचा विषय ऐरणीवर आला आहे. यवतमाळ जिल्ह्यात भाजपचे पाच विधानसभा सदस्य आणि एक विधान परिषद असे सहा आमदार आहेत. त्यातही दोघेजण माजी मंत्री असतानाही त्यांना मंत्रिमंडळात संधी मिळाली नाही. दुसरीकडे शिंदे गटातील एकमेव आमदार असलेल्या संजय राठोड यांना मंत्रिपदापाठोपाठ पालकमंत्रिपदही मिळाले. याची खदखद स्थानिक भाजपत आहे. यामुळेच तर चित्रा वाघ यांच्या माध्यमातून संजय राठोड यांच्यावर निशाणा साधला नाही ना? अशी चर्चा आता रंगू लागली आहे. पत्रकार परिषदेला उपस्थित असलेल्या आमदारांसह भाजप जिल्हाध्यक्षांनीही पत्रपरिषदेत वाद टाळण्याचा प्रयत्न न केल्याने भाजपच्या शिंदे गटाविरुद्ध सुरु असलेल्या कुरघोड्यांना एक प्रकारे पुष्टीच मिळत आहे.

Web Title: BJP's eye on Shinde faction-held constituency;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.