महाविकास आघाडीचे ठरले, भाजपचीही ऑफर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2019 06:00 AM2019-12-28T06:00:00+5:302019-12-28T06:00:11+5:30

प्रभारी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी १३ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा बोलविली आहे. त्यात नवे अध्यक्ष निवडले जाणार आहे. त्याच दिवशी सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत सभेच्या ठिकाणी नामांकन अर्ज स्वीकारले जाणार आहे. यवतमाळ जिल्हा परिषदेत सर्वाधिक २० जागा शिवसेनेकडे आहेत. भाजपकडे १८, काँग्रेसकडे अपक्षासह १२ तर राष्ट्रवादीकडे ११ जागा आहेत.

BJP's offer | महाविकास आघाडीचे ठरले, भाजपचीही ऑफर

महाविकास आघाडीचे ठरले, भाजपचीही ऑफर

Next
ठळक मुद्देजिल्हा परिषद : नव्या अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवडणूक १३ जानेवारीला

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्हा परिषदेच्या आगामी अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापती पदाची निवडणूक १३ जानेवारी रोजी होत आहे. या निवडणुकीत राज्य विधिमंडळातील सत्तेचा पॅटर्न कायम राहणार आहे. जिल्हा परिषदेतही शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस ही महाविकास आघाडी सत्तेचे समीकरण मांडणार आहे. या समीकरणाला सुरूंग लावण्याचा प्रयत्न भाजपने चालविला असून काँग्रेस-राष्ट्रवादीला चारपदे देण्याची ऑफर दिली गेली असल्याची माहिती आहे.
प्रभारी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी १३ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा बोलविली आहे. त्यात नवे अध्यक्ष निवडले जाणार आहे. त्याच दिवशी सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत सभेच्या ठिकाणी नामांकन अर्ज स्वीकारले जाणार आहे.
यवतमाळ जिल्हा परिषदेत सर्वाधिक २० जागा शिवसेनेकडे आहेत. भाजपकडे १८, काँग्रेसकडे अपक्षासह १२ तर राष्ट्रवादीकडे ११ जागा आहेत. सर्वाधिक जागा असूनही पहिले दोन वर्ष भाजपने काँग्रेस-राष्ट्रवादीशी हातमिळवणी करीत शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवले होते. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जुळवून घेत सेनेला सत्तेचा वाटा दिला व राष्ट्रवादीला दूर केले. राज्यात विधानसभेत सर्वाधिक १०५ जागा मिळूनही शिवसेनेने भाजपला सत्तेतून बाद केले. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडी स्थापन करून शिवसेना सत्तेत आली आहे. भाजपला अद्दल घडविण्यासाठी संपूर्ण राज्यातच आगामी काळात होणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी हा महाविकास आघाडीचा पॅटर्न कायम ठेवण्याचे धोरण तीनही पक्षांनी निश्चित केले आहे.
त्यानुसार यवतमाळ जिल्हा परिषदेत होणाऱ्या आगामी अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणुकीत महाविकास आघाडीचा विधीमंडळातील पॅटर्न राबविण्याचे निश्चित झाले आहे. अध्यक्षपद सर्वाधिक जागा असल्याने शिवसेनेकडे राहील. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या सारख्याच जागा असल्याने नियमानुसार ते एका जागेसाठी पात्र ठरतात. मात्र राष्ट्रवादीने दोन पदांची मागणी केल्याची माहिती आहे. स्थानिक पातळीवर जागा वाटपाबाबत वाद असला तरी महाविकास आघाडीचे धोरण निश्चित असल्याने पक्षश्रेष्ठींकडून तीनही पक्षाच्या स्थानिक प्रमुखांना योग्यवेळी ‘मार्गदर्शन’ केले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पदांच्या वाटपाचा हा वाद फार गांभीर्याचा विषय नसल्याचे सांगितले जाते.
महाविकास आघाडीतील पदे वाटपावरून सुरू असलेल्या धुसफूसचा फायदा उठविण्याचा प्रयत्न १८ जागा असलेल्या भाजपकडून सुरू आहे. आम्हाला केवळ उपाध्यक्ष व एक सभापती पदे हवे असे म्हणून भाजपने काँग्रेस व राष्ट्रवादीला चार पदे देण्याची तयारी दर्शवित सत्तेची आॅफर दिली असल्याची माहिती आहे. परंतु पक्षाकडून महाविकास आघाडीच्याच वाटेने जाण्याचे आदेश असल्याने स्थानिक पातळीवर काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते इच्छा असूनही वेगळा निर्णय घेण्याचे धाडस दाखविण्याची तिळ मात्र शक्यता नाही. जिल्हा परिषदेतील आगामी सत्ता स्थापनेच्या दृष्टीने काँग्रेसची स्थानिक पातळीवर बैठक पार पडली असून पक्ष जो आदेश देईल तो शिरसावंद्य मानन्याचे ठरविण्यात आले.

अध्यक्ष पद शिवसेनेकडे, दिग्रस मतदारसंघासाठी जोर
जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीचीच सत्ता येईल असे गृहित धरुन शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीने संभाव्य पदाधिकारी कोण याबाबत चाचपणी चालविली आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद खुल्या संवर्गातील महिलेसाठी राखीव आहे. अध्यक्षपद शिवसेनेकडे जाण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे शिवसेनेतील महिला सदस्यांमध्ये चढाओढ पहायला मिळते. त्यातही हे अध्यक्षपद शिवसेना नेते, भावी कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्या दिग्रस विधानसभा मतदारसंघात जाण्याचीच शक्यता अधिक मानली जाते. आता तेथे बंजारा समाजातील महिलेला संधी दिली जाते की, बंजारेत्तर याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.

उपाध्यक्ष पदासाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी
उपाध्यक्ष पदासाठी काँग्रेस व राष्ट्रवादीत रस्सीखेच पहायला मिळते. बांधकाम व अर्थ सभापती पदासाठी सर्वाधिक चढाओढ राहणार आहे. कारण जिल्हा परिषदेत मोठी ‘उलाढाल’ असलेले हे एकमेव प्रमुख पद आहे. त्यामुळे या पदासाठी इच्छुकांच्या उड्या पडणार आहेत. शिवसेना अध्यक्ष पदासोबत एका सभापती पदावर दावा करणार आहे. उपाध्यक्षपद घेणाऱ्या पक्षाला सभापती पद देण्यास विरोध राहू शकतो. अध्यक्ष व उपाध्यक्ष पद न मिळालेल्या महाविकास आघाडीतील तिसºया पक्षाचा तीन सभापती पदासाठी आग्रह राहण्याची अधिक शक्यता आहे.

Web Title: BJP's offer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.