भाजपचे जुने तीन शिलेदार रिंगणात; यवतमाळ, वणी आणि राळेगाव येथे विद्यमान आमदारांनाच संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2024 06:30 PM2024-10-21T18:30:37+5:302024-10-21T18:31:32+5:30

दोन जागांचा तिढा : दिग्रस, पुसदमध्ये युतीतील घटक पक्षाचे उमेदवार

BJP's old three stoners in the fray; Only sitting MLAs in Yavatmal, Vani and Ralegaon have a chance | भाजपचे जुने तीन शिलेदार रिंगणात; यवतमाळ, वणी आणि राळेगाव येथे विद्यमान आमदारांनाच संधी

BJP's old three stoners in the fray; Only sitting MLAs in Yavatmal, Vani and Ralegaon have a chance

लोकमत न्यूज नेटवर्क 
यवतमाळ :
उमेदवारी कुणाला याची चर्चा सध्या संपूर्ण जिल्ह्यात सुरू आहे. प्रत्येक पक्षातील इच्छुकांच्या कार्यकर्त्यांकडून आपलाच नेता उमेदवार असे ठामपणे सांगण्यात येत आहे. भाजप जिल्ह्यात नव्या चेहऱ्यांना संधी देणार, भाकरी पलटवणार अशी चर्चा जोरात होती. मात्र जुन्याच शिलेदारांवर भरवसा दाखवत यवतमाळ, वणी आणि राळेगाव येथे विद्यमान आमदारांनाच संधी दिली आहे.


उमरखेड आणि आर्णी मतदारसंघात उलटफेर करण्याबाबत पक्षस्तरावर चर्चा सुरू आहे. तेथे विद्यमान आमदारापेक्षा तोडीचा चेहरा शोधला जात आहे. उमरखेडमध्ये माजी आमदार नजरधने यांना पुन्हा संधीची शक्यता आहे तर केळापूरमध्ये मतदारसंघाबाहेरचा नवीन चेहरा दिला जाऊ शकतो. सध्या या दोन्ही मतदारसंघांचा निर्णय राखीव ठेवला आहे. शिवाय उमरखेड मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव असून येथे महायुतीतील आठवले गटाने दावा केला आहे. 


दिग्रस विधानसभेत शिंदेसेनेकडून पालकमंत्री संजय राठोड यांची उमेदवारी पक्की असून त्यांच्या जाहीर प्रचारालाही सुरुवात झाली आहे. त्यासोबतच पुसदमध्ये मात्र द्विस्ट निर्माण झाला आहे. विद्यमान आमदार इंद्रनील नाईक अजित पवार गटात राहतील की बदलत्या वातावरणानुसार शरद पवार गटाकडून महाविकास आघाडीचा शेला खांद्यावर घेतील याबाबतच्या घडामोडी सुरू आहेत. असे झाल्यास महायुतीकडून कोणता उमेदवार दिला जातो. मतदारसंघावर भाजप दावा करणार की अजित पवार गटाकडूनच उमेदवार दिला जाणार याचाही अंदाज लावणे तूर्तास कठीण आहे. 


महायुतीतील भाजपने उमेदवार जाहीर करून चित्र स्पष्ट केले आहे. सध्या तरी युतीतील विद्यमान सात आमदारांपैकी चार आमदारांची उमेदवारी पक्की आहे. उर्वरित तीन जागांवर खल सुरू आहे. महाविकास आघाडीत अजूनही कुठलाच निर्णय झालेला नाही. उद्धवसेना किती जागा घेणार, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस या तीन घटक पक्षात जागा वाटपावर चर्चेचे गुऱ्हाळ सुरू आहे. पुढचे दोन दिवस आघाडी व युतीतील इच्छुकांची धडधड वाढविणारे आहे. श्रेष्ठीचा काय आदेश येतो, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहे. 


महाविकास आघाडीचे इच्छुक दिल्लीत
महाविकास आघाडीतील इच्छुक उमेदवारांनी दिल्लीकडे कूच केली आहे. माजी मंत्री वसंत पुरके यांचा समावेश आहे. तसेच महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष संध्याताई सव्वालाखे यासुद्धा दिल्लीत तळ ठोकून आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी आमदार संदीप बाजोरिया हे मुंबईत आहेत. इच्छुकांकडून राज्याच्या नेत्यानंतर आता दिल्लीत मोर्चेबांधणी केली जात आहे. दोन दिवसांत संपूर्ण चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. 


उमरखेडसाठी आठवले गटही आक्रमक 
महायुतीमधून पाच ते सहा जागा रिपब्लिक पक्षाला सोडण्याची मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. यामध्ये उमरखेड विधानसभा मतदारसंघाचाही समावेश आहे, आठवले यांनी सागर बंगल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून चर्चा केली. यावेळी रिपाइंच्या पदाधिकाऱ्यांसह इच्छूक उमेदवार महेंद्र मानकरही उपस्थित होते.


रासपही उमेदवार देणार 
महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने जिल्ह्यातील सर्व सात जागांवर उमेदवार देण्यात येणार असल्याचे पक्षाचे विदर्भ अध्यक्ष डॉ. तौसिफ शेख यांनी रविवारी पत्रकार परिषदेत सांगितले, याप्रसंगी जिल्हाध्यक्ष सूरज ठाकूर, प्रदेश कार्यकारिणी सदस्य अक्कलवार, महानगराध्यक्ष स्वप्नील देशमुख, धरमसिंह ठाकूर, शुभम रूपनर आदी उपस्थित होते.

Web Title: BJP's old three stoners in the fray; Only sitting MLAs in Yavatmal, Vani and Ralegaon have a chance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.