ढाणकी पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर भाजपची बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2021 05:19 PM2021-12-22T17:19:29+5:302021-12-22T17:34:12+5:30
ढाणकी येथील नगरपंचायतीच्या दोन रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक झाली. या दोन्ही जागा भाजपने दाेन जागा पटकाविल्या आहेत.
यवतमाळ : ढाणकी येथील नगरपंचायतीच्या दोन रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक झाली. त्यात दोन्ही जागांवर भाजपच्या उमेदवारांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पराभूत केले.
प्रभाग क्र. १२ आणि १३ मधील नगरसेवकांनी विहित वेळेत जातवैधता प्रमाणपत्र सादर केले नव्हते. त्यामुळे त्यांचे सदस्यत्व रद्द झाले होते. या दोन्ही जागांवर निवडणूक घेण्यात आली. त्यात प्रभाग क्र. १३ मधून भाजपच्या दुर्गा साई मनतेवाड यांना ३३९ तर प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीच्या उमेदवार लीला नीलेश नीलपवार यांना २३१ मते मिळाली. मनतेवाड १०८ मतांनी विजयी झाल्या. अपक्ष उमेदवाराची अनामत जप्त झाली.
प्रभाग क्र. १२ मध्ये भाजपच्या उमेदवार मोहिनी पंकज केशेवाड यांना २८७ तर प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीच्या उमेदवार वंदना दत्ता पराते यांना २२८ मते मिळाली. केशेवाड यांनी पराते यांचा ५९ मतांनी पराभव केला. पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर भाजपने विजय मिळविल्याने नगरपंचायतीचे सत्ता समीकरण बदलण्याचे संकेत मिळत आहेत. मात्र, अद्यापही भाजप बहुमतापासून दूर आहे.
भाजपचे संख्याबळ वाढले
सार्वत्रिक निवडणुकीत १७ पैकी तब्बल ६ जागांवर काँग्रेसने विजय मिळविला होता. भाजपचे ४ सदस्य विजयी झाले होते. याशिवाय थेट नगराध्यक्षपदी भाजपचे उमेदवार विजयी झाले होते. वंचित बहुजन आघाडी आणि अपक्षांनी प्रत्येकी दोन जागा तर राष्ट्रवादीने एका जागी विजय मिळविला होता. शिवसेनेने दोन जागांवर विजय मिळविला होता. त्यांच्या या दोन्ही सदस्यांचे सदस्यत्व रद्द झाले. आता नगरपंचायतीत भाजपचे दोन सदस्य वाढले आहे. त्यामुळे नगराध्यक्षांसह त्यांचे संख्याबळ सातवर पोहोचले आहे.