लोकसभेसाठी भाजपाचा ‘योगी’ पॅटर्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 10:41 PM2018-08-12T22:41:11+5:302018-08-12T22:41:41+5:30
जिल्ह्यातील भाजपाच्या धुरिणांना आगामी निवडणुकांचे वेध लागले आहेत. सध्या शिवसेनेच्या पारड्यात असलेला यवतमाळ मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी स्थानिक भाजपा नेतृत्वाचा कस लागत असतानाच पक्षश्रेष्ठी मात्र ‘नवा गडी नवा डाव’ मांडण्याच्या बेतात आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यातील भाजपाच्या धुरिणांना आगामी निवडणुकांचे वेध लागले आहेत. सध्या शिवसेनेच्या पारड्यात असलेला यवतमाळ मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी स्थानिक भाजपा नेतृत्वाचा कस लागत असतानाच पक्षश्रेष्ठी मात्र ‘नवा गडी नवा डाव’ मांडण्याच्या बेतात आहेत. शनिवारी केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी यवतमाळात अकस्मात भेट देऊन आधीच आॅफर दिलेल्या ‘योग्या’ला निवडणूक लढविण्यासाठी गळ घातल्याची चर्चा आहे. उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ सरकार आले, त्याच धर्तीवर महाराष्ट्रातूनही संत-महंतांना निवडणुकीच्या मैदानात उतरविण्याचा भाजपा पक्षश्रेष्ठींचा मनसुबा ‘मनेका भेटी’ने उघड झाला आहे.
केंद्रीय महिला व बालविकास मंत्री मनेका गांधी अत्यंत गोपनीय पद्धतीने शनिवारी यवतमाळात आल्या. वाघापूर रोडवरील अध्यात्मिक गुरू प्रेमासाई महाराजांच्या निवासस्थानी तब्बल दोन तास त्यांनी चर्चा केली. महाराजांचे दर्शन, गोरक्षण समितीचे गठण या वरवरच्या विषयाआड सखोल राजकीय खलही या भेटीत झाला. खुद्द प्रेमासाई महाराजांनीच ‘लोकमत’शी बोलताना भाजपाची नवी रणनीती उघड केली. ते म्हणाले, जुलै मे दिल्ली बुलाकर मुझे यवतमालसे एमपी के लिए लढने का प्रस्ताव दिया गया था. या भेटी दरम्यान भाजपा अध्यक्ष अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लालकृष्ण अडवाणी, गुजरातमधील खासदार लालूभाई पटेल आदी हजर होते. पक्षश्रेष्ठींनी ठेवलेला प्रस्ताव प्रेमासार्इंनी मात्र नाकारला. इलेक्शन लढूंगा तो मैं धर्म से भटक जाऊंगा, असे उत्तर त्यांनी दिले. पण पक्षाध्यक्षांनी महाराजांना मार्ग दाखविलाच. अमित शहा म्हणाले, योगीजी को देखो, धर्म का काम करते हुए भी राजनीती मे आये. उनकी सरकार भी बनी. आप भी कर सकते हो. जुलैमधील हा सर्व वृत्तांत प्रेमासार्इंनी ‘लोकमत’ला सांगितला. ते म्हणाले, मी लोकसभा लढविण्यास नकार दिला, तरी अमित शहाजींनी मला विचार करण्यासाठी वेळ दिला आहे. त्यांचा विचार पक्का झाला का, याचा अदमास शनिवारी मनेका गांधींनी नकळत घेतला.
मनेका गांधी निघून गेल्यावर प्रेमासाई ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले, माझा निवडणूक लढण्याचा विचार नाही, पण भाजपा यवतमाळ लोकसभा मतदार संघात नवा चेहरा देण्याच्या तयारीत आहे. महाराष्ट्रात भाजपाच्या जुन्या चेहऱ्यांबाबत आता लोकांमध्ये नकारात्मक भावना निर्माण झाली आहे.
‘कुछ चेहरे निगेटिव्ह हो गए हैं’ असे म्हणत प्रेमासाई म्हणाले, नकारात्मकता अडचणीची ठरू नये, म्हणूनच नवे उमेदवार दिले जाणार आहेत. मी निवडणूक लढलो तर कदाचित जिंकेनही पण अध्यात्माचे काम संपून जाईल. योगीजी मुख्यमंत्री झाले, पण त्यांचा ‘बेस’ असलेली हिंदू युवा वाहिनी आज विखुरली. त्यांचा ‘उजवा हात’ असलेले सुनील सिंग आज जेलमध्ये आहेत.
यवतमाळ लोकसभेसाठी प्रेमासार्इंनी नकार दिला असला, तरी ते सतत भाजपा नेत्यांच्या संपर्कात आहेत. १५ आॅगस्टला खासदार वरूण गांधी, सप्टेंबरमध्ये गृहमंत्री राजनाथसिंग आपल्या भेटीला येणार असल्याचे सूतोवाचही महाराजांनी केले. शिवाय, गौरक्षा पदयात्रेच्या निमित्ताने आपण लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदींशीही चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यातून महाराज कुंपन रेषेवर असल्याचे स्पष्ट होते. पक्षश्रेष्ठींकडून दबाव आल्यास धर्माच्या छत्रछायेतून ते राजकीय रणात उतरण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
कोण आहेत, प्रेमासाई महाराज
मूळचे चंद्रपूरचे असलेले प्रेमासाई चौथीपर्यंत शिकल्यावर आसाममध्ये गेले. तेथे समीरदासजी महाराज या गुरूंच्या सानिध्यात त्यांनी अध्यात्माचे धडे गिरविले. आणि २०१४ पासून यवतमाळचे रहिवासी झाले. विविध टीव्ही वाहिन्यांवर त्यांचे प्रबोधन लोक ऐकतात. या प्रवासात अनेक राजकीय सेलिब्रिटींची त्यांच्या भक्तमंडळीत नोंद झाली. केंद्रीय मंत्री मनेका गांधी, राजनाथ सिंग, गुजरातचे खासदार लालूभाई पटेल, बुलडाण्याचे चैनसुख संचेती, खासदार सुप्रिया सुळे, भाजपा नेते आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा, राजदचे नेते लालूप्रसाद यादव आदींशी सख्य असल्याचे प्रेमासाई सांगतात.
अण्णा हजारे म्हणाले, निवडणूक लढा
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंशीही प्रेमासार्इंचे चांगले संबंध आहेत. भाजपाकडून उमेदवारीची आॅफर आल्यानंतर प्रेमासार्इंनी त्यांच्याशी चर्चा केली. त्याबाबत प्रेमासाई म्हणाले, लोकपाल बिलासाठी अण्णांनी जी पुस्तिका तयार केली होती, त्याची पहिली प्रत त्यांनी मला भेट दिली. निवडणूक लढावी का, असे विचारले तेव्हा अण्णा म्हणाले होते, पक्षाकडून लढू नका. अपक्ष लढणार असाल तर तुमच्या प्रचाराला मी स्वत: येईल.