शिक्षकांनी लावल्या काळ्या फिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:42 AM2021-09-19T04:42:52+5:302021-09-19T04:42:52+5:30
पुसद : महाविद्यालये, शाळा, शिक्षक, कर्मचारी आणि संस्थाचालक या विविध घटकांच्या अनेक समस्या शासन दरबारी प्रलंबित आहे. ...
पुसद : महाविद्यालये, शाळा, शिक्षक, कर्मचारी आणि संस्थाचालक या विविध घटकांच्या अनेक समस्या शासन दरबारी प्रलंबित आहे. त्या सोडविण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी शिक्षकांनी काळ्या फिती बांधून आंदोलन केले.
शासनाचे लक्ष वेधण्यासाठी व प्रलंबित समस्या सोडविण्याच्या मागणीसाठी अमरावती विभागातील शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांनी महाविद्यालय व शाळेत काळ्या फिती लावून काम करण्याचे आवाहन केले होते. तसेच शिक्षणाधिकारी आणि गटशिक्षणाधिकाऱ्यांमार्फत शिक्षणमंत्री व शिक्षण राज्यमंत्र्यांना प्रलंबित मागण्याचे निवेदन देण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार तालुक्यातील अनेक महाविद्यालय व शाळेतील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून काम केले. गटशिक्षणाधिकारी संजय कांबळे यांच्यामार्फत शिक्षणमंत्री, शिक्षण राज्यमंत्री यांना निवेदन पाठविले. निवेदन देताना शिक्षक महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष पंजाबराव सुरोशे, शहर अध्यक्ष शिवशंकर घरडे, गोविंदा वडे, बाळासाहेब कऱ्हे, शेषराव राठोड, कृणाल मोहेकर आदी उपस्थित होते.