एसीसीतील स्फोटाने गोवारीला हादरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 05:00 AM2021-07-31T05:00:00+5:302021-07-31T05:00:12+5:30
नियमानुसार दुपारी १२.३० ते १.३० व ३.३० ते ४.३० या वेळात खाणीत स्फोट करणे अपेक्षित आहे. परंतु एसीसी प्रशासनातील काही मुजोर अधिकारी ब्लास्टिंगच्या वेळाच पाळत नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. गुरुवारी तर चक्क रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास स्फोट घडविण्यात आले. त्यामुळे खाणीतील दगड गोवारी रस्त्यावर येऊन पडले. तसेच परिसरातील शेतांमध्येही मोठमोठे दगड येऊन पडल्याने पिकांची मोठी हानी झाली. यामुळे गावकरी संतापले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : तालुक्यातील शिंदोला परिसरात असलेल्या एसीसी खाणीत नियमबाह्य पद्धतीने मोठ्या प्रमाणावर उत्खननासाठी बारूदीचे स्फोट केले जात असून, त्यामुळे या खाणीलगत असलेल्या गोवारी गावाला चांगलेच हादरे बसत आहेत. अनेक घरांना यामुळे तडे गेले आहेत. दरम्यान, शुक्रवारी शिवसेना उपजिल्हा प्रमुख संजय निखाडे यांच्या नेतृत्त्वात गावकऱ्यांनी एसीसी कंपनीत जाऊन यासंदर्भात जाब विचारला.
यावेळी वणीचे तहसीलदार विवेक पांडे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार, शिरपूरचे ठाणेदार सचिन लुले आदी उपस्थित होते. या अधिकाऱ्यांपुढे गावकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या. चर्चेअंती यापुढे वेळा पाळूनच खाणीत स्फोट केले जातील, असे आश्वासन कंपनीतर्फे देण्यात आले. यासोबतच काही मागण्यादेखील गावकऱ्यांनी केल्या. त्यासंदर्भातही कंपनीने सकारात्मक भूमिका घेतली. नियमानुसार दुपारी १२.३० ते १.३० व ३.३० ते ४.३० या वेळात खाणीत स्फोट करणे अपेक्षित आहे. परंतु एसीसी प्रशासनातील काही मुजोर अधिकारी ब्लास्टिंगच्या वेळाच पाळत नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. गुरुवारी तर चक्क रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास स्फोट घडविण्यात आले. त्यामुळे खाणीतील दगड गोवारी रस्त्यावर येऊन पडले. तसेच परिसरातील शेतांमध्येही मोठमोठे दगड येऊन पडल्याने पिकांची मोठी हानी झाली. यामुळे गावकरी संतापले. माजी आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख विश्वास नांदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना उपजिल्हा प्रमुख संजय निखाडे यांच्या नेतृत्त्वात शुक्रवारी सकाळी याबाबत वणीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देऊन ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आली. गोवारी येथील एसीसीच्या खाणीत सततच्या ब्लास्टिंगमुळे गावातील अनेक घरांना तडे गेले आहेत. या खाणीत मोठ्या प्रमाणावर अवैध उत्खनन केले जात असल्याचा आरोपही एसडीओंना देण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आला आहे.