आंधळ्या राजा-राणीचा सुखी संसार!

By Admin | Published: January 3, 2017 02:18 AM2017-01-03T02:18:26+5:302017-01-03T02:18:26+5:30

नवरा-बायको दोघेच. पदारात दोन लहानगे जीव. त्याने कमवायचे अन् तिने रांधायचे. मिळून एकाच ताटात जेवण

Blind king and queen happy world! | आंधळ्या राजा-राणीचा सुखी संसार!

आंधळ्या राजा-राणीचा सुखी संसार!

googlenewsNext

डोळे नाही दृष्टी आहे : नातेवाईकांनी झिडकारले, बँकांनी कर्ज नाकारले
अविनाश साबापुरे ल्ल यवतमाळ
नवरा-बायको दोघेच. पदारात दोन लहानगे जीव. त्याने कमवायचे अन् तिने रांधायचे. मिळून एकाच ताटात जेवण करायचे. म्हणायला गेले तर, राजा-राणीचा संसार. पण राजा आणि राणी दोघेही अंध. घर म्हणजे झोपडी अन् रोजगाराचे साधन म्हणजे केवळ मनाची हिंमत! दोघांच्याही चेहऱ्यावर हास्य विलसते. हसत-हसतच सोमवारी त्यांनी ‘लोकमत’ला आपली विवंचना सांगितली, ‘किराणा दुकानासाठी आम्ही बँकेला कर्ज मागितले. पण तुम्ही अंध आहात. तुमचा धंदा चालणार नाही. मग कर्ज कसे फेडाल? असे म्हणून आम्हाला दोन-तीन बँकांनी कर्ज नाकारले.’ कसा होत असेल हा संसार? प्रश्न पडणे साहजिक आहे. पण फकरूद्दीन आणि तबस्सूम या दाम्पत्याला असा कुठलाही प्रश्न कधीच पडत नाही. छोट्या-छोट्या कारणांसाठी भांडणाऱ्या नवरा-बायकोसाठी ही कहाणी म्हणजे सुखी संसाराचा वास्तूपाठ ठरावा.
यवतमाळच्या मालाणी नगरातील ही कहाणी आहे. फकरूद्दीन गॅसुद्दीन सैयद आणि तबस्सूम परवीन फकरुद्दीन सैयद हे तरुण दाम्पत्य अंध आहे. दृष्टीहीन असल्यामुळेच कदाचित त्यांच्याकडे धाडस हे एक जादा इंद्रिय असावे. फकरुद्दीन पाच वर्षांचा असतानाच आजारी पडला. डोळे आले. गरिबीमुळे उपचारच झाला नाही अन् दोन्ही डोळ्यांपुढे कायमचा अंधार झाला. तबस्सूमलाही तीन वर्षांची असतानाच ‘देवीच्या साथी’त अंधत्व आले. हे दोन अंध गलबतं एकत्र येऊन आता सुरक्षित किनारा शोधत आहेत.
गरिबीमुळे फकरुद्दीनला लहानपणापासून एका नातेवाईकाकडे राहून दिवस काढावे लागले. तो बारावीपर्यंत शिकला. शिकता-शिकताच रोजगारासाठी धडपडला. एखाद्या चौकात पोते अंथरून खेळणी विकणे सुरू केले. १९९५ मध्ये त्याने जिल्हा परिषदेत शिपाई होण्याचा प्रयत्न केला. त्याला पोस्टाने कॉलही आला. पण तो शिपाई होऊ शकला नाही. कारण विचारले तर फकरुद्दीन म्हणाला, ‘मला कॉलच उशिरा मिळाला...’ त्याचे उत्तर अडखळले. भिरभिरणाऱ्या डोळ्यात पाणी तरळले. दाटलेल्या कंठाने तो बोलला, ‘ज्या नातेवाईकाकडे मी राहात होतो, त्यांनी मला तो कॉल दाखवलाच नाही. खूप दिवस झाल्यावर मग एक दिवस दाखवला. तेव्हा वेळ निघून गेली होती...’ त्याचे हे बोलणे सुरू असतानाच त्याची पत्नी तबस्सूम ताडकन् म्हणाली, ‘लेकीन क्या हुआ? मेरे बच्चे तो अभीभी अच्छेसेही जी रे ना!’ तिच्या चेहऱ्यावरचा संताप फकरुद्दीनला दिसला नाही, पण तिच्या संतुष्ट शब्दांमुळे त्याच्या चेहऱ्यावर समाधान पसरले. दोघेही हसले. संसारातला असा गोडवा राखूनच ते एकमेकांना धीर देतात. फकरूद्दीनच रोजची कमाई शंभर दीडशेची. संध्याकाळी दोघेही एकमेकांचा हात धरून दुकानात जातात. तांदूळ आणि इतर साहित्य आणतात. रस्त्यावरच्या विहिरीतून पाणी काढतात. स्वयंपाक करून एकाच ताटात दोघेही जेवतात.
दोघांनीही चांगले किराणा दुकान टाकण्याचा विचार केला. बिज भांडवल योजनेतून कर्जाचे प्रकरण तयार केले. दुकानाचे कोटेशन, अंधत्वाचे प्रमाणपत्र, रहिवासी दाखला आदी विविध कागदपत्रांसह दोन-तीन बँकांकडे प्रकरण दिले. पण अंध असल्याने परतफेड करू शकणार नाही, अशी शंका घेऊन त्यांना कर्ज नाकारण्यात आले. नातेवाईकांनी झिडकारले, बँकांनी परतवले. आता ते जगण्याचा संघर्ष करीत असले तरीही एकमेकांसोबत प्रचंड खूश आहेत!

त्यांच्या मनात खुशी आणि अमन!
४हे दोघेच यवतमाळच्या रस्त्यांवर एकमेकांचा हात धरून चालताना अनेकांनी पाहिले. पण त्यांनी आपले हात कुणापुढेच पसरले नाही. दुनियादारीच्या हजारो ठोकरा त्यांनीही पचवल्या. दु:ख पचवूनही ते हसायला शिकले आहेत. म्हणूनच आपल्या पोटी जन्मलेल्या मुलांची नावेही त्यांनी खुशी आणि अमन ठेवली आहेत. तुम्ही दिसत नसतानाही खरेदी कसे करता, खेळणी कशी विकता, लोकांनी दिलेले पैसे बरोबर आहे हे कसे ओळखता आदी प्रश्नांवर फकरुद्दीन म्हणाला, ‘खूश राहाचं असन तं जादा हिसाब किताब ठेवाले पुरत नाई. जमान्यावर ईश्वास ठेवाच लागते.’

आता निराधारची प्रतीक्षा
फकरुद्दीन आणि तबस्सूम दोघेही अंध असल्याने त्यांनी निराधार योजनेच्या मानधनासाठी अर्ज केला आणि त्यांना हे सहाशे रुपयांचे मानधन मिळतेही. पण आता दिवाळीपासून त्यांना निराधारचे पैसे मिळालेले नाहीत. तहसीलमध्ये रोज एकमेकांचा हात धरून चकरा मारतात. थातूरमातूर उत्तर ऐकून पुन्हा घरी येतात. पण तहसील प्रशासनावरही त्यांना रोष नाही. तबस्सूम म्हणाली, ‘मिलेंगेच आज नही तो कल.’ पण निराधार न भेटल्याने खेळणी विकत घेण्यासाठी फकरुद्दीनकडे पैसेच नाही. त्यामुळे तोही धंदा बंद आहे. फकरुद्दीन म्हणाला, ‘मी जास्त माल घेत नाही म्हणून मेनलाईनमधला दुकानदार उधारीत माल देत नाही.’

Web Title: Blind king and queen happy world!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.