खर्षी येथे आढळले रक्तचंदनाचे झाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2018 11:26 PM2018-01-03T23:26:17+5:302018-01-03T23:26:29+5:30
महाराष्ट्रात दुर्मिळ असलेल्या रक्तचंदनाचे झाड वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्व मार्गाच्या कामामुळे तालुक्यातील खर्षी येथे प्रकाशात आले असून रक्तचंदनाचे झाड असल्याचे शिक्कामोर्तब वन विभागाने केले आहे. त्यामुळे या वृक्षाला पाहण्यासाठी नागरिकांनी शेतात गर्दी केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : महाराष्ट्रात दुर्मिळ असलेल्या रक्तचंदनाचे झाड वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्व मार्गाच्या कामामुळे तालुक्यातील खर्षी येथे प्रकाशात आले असून रक्तचंदनाचे झाड असल्याचे शिक्कामोर्तब वन विभागाने केले आहे. त्यामुळे या वृक्षाला पाहण्यासाठी नागरिकांनी शेतात गर्दी केली आहे.
खर्षी येथील शेतकरी पंजाबराव केशवराव शिंदे यांच्या शेतातून रेल्वे मार्ग जात आहे. भुसंपादनाचे काम सुरु असताना कर्मचारी व अधिकाऱ्यांचे एक वृक्षाने लक्ष वेधून घेतले. रक्तचंदनाचे झाड असल्याचे सांगण्यात आले. त्यावरून ही माहिती पुसद वनविभागाचे उपवनसंरक्षक अरविंद मुंढे यांना दिली. त्यांनी या वृक्षाची पाहणी केली. तसा अहवाल आंध्रप्रदेशातील मुख्य वनसंरक्षणाकडे पाठविला. त्यांनी हे झाड रक्तचंदनाचे असल्याचे स्पष्ट केले. तसेच उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले यांनीही झाडाचा अहवाल वरिष्ठांकडे पाठविला.
रक्तचंदनाचे झाड महाराष्टÑात आढळत नाही परंतु आंध्रप्रदेशात रक्तचंदन आढळते. त्यामुळे या झाडाची खात्री करण्यासाठी अहवाल पाठविण्यात आला होता. सदर झाडाचे वजन अर्धा टन आहे. बाजारपेठेत रक्तचंदन मोठ्या किंमतीला विकले जाते. अभावाने दिसणारा रक्तचंदनाचा वृक्ष पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत रक्तचंदनाला मोठी मागणी असून त्याला भरपूर किमत येत असल्याचे सांगितले
सुरक्षेसाठी उपाय योजना
बहुमूल्य रक्तचंदनाचे झाड कोणी तोडून नेऊ नये म्हणून शेतकरी पंजाबराव शिंदे यांनी सुरक्षेच्या उपाय योजना केल्या आहे. तसेच या झाडापासून आपल्याला आर्थिक प्राप्ती होईल असेही त्यांनी सांगितले.