पांढरकवडा, दारव्हा येथे तरुणांचा निर्घृण खून

By Admin | Published: February 25, 2017 12:53 AM2017-02-25T00:53:35+5:302017-02-25T00:53:35+5:30

दारव्हा तालुक्यातील रामगाव (हरू) आणि पांढरकवडा येथे तरुणांचा निर्घृण खून करण्याची घटना घडली.

The bloodless murder of the youth at Pandarkarda, Darwha | पांढरकवडा, दारव्हा येथे तरुणांचा निर्घृण खून

पांढरकवडा, दारव्हा येथे तरुणांचा निर्घृण खून

googlenewsNext

रामगावमध्ये कोयत्याने वार : पांढरकवड्यात तिघांना अटक
दारव्हा/पांढरकवडा : दारव्हा तालुक्यातील रामगाव (हरू) आणि पांढरकवडा येथे तरुणांचा निर्घृण खून करण्याची घटना घडली. रामगाव येथे कोयत्याने वार करून तरुणाला ठार मारले तर पांढरकवडा येथे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणाचा लोखंडी पाईपने डोक्यावर प्रहार करून निर्घृण खून करण्यात आला.
पांढरकवडा येथील गुंड प्रवृत्तीच्या पंकज प्रकाश मडकाम (२५) याची शुक्रवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास तीन युवकांनी धारदार शस्त्र व लोखंडी पाईपने प्रहार करून निर्घृण हत्या केली. एसटी आगाराच्या बाजूने असलेल्या क्रीडा संकुलाकडे जाणाऱ्या रहदारीच्या रस्त्यावर ही हत्या झाल्याने बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंकज मडकामवर पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे आहेत. तो शस्त्राचा धाक दाखवून पैसे उकळायचा. दारूसाठी कुणालाही धमकी देत होता. गुरुवारपासून आरोपी मिथून उईके, कुणाल भगत रा. पांढरकवडा व शेखर देशट्टीवार रा. सोनबर्डी या तिघांना तो दारूसाठी पैसे मागत होता. पैसे दिले नाही तर तुम्हाला सोडणार नाही, अशी धमकीही देत होता. या प्रकाराला कंटाळून या तिघांनी त्याला संपविण्याचा कट आखला. पंकज आपला मित्र विक्रम जेधेसह एसटी आगाराच्या बाजूला असलेल्या स्टेडियमकडे जाणाऱ्या रस्त्याने शुक्रवारी सायंकाळी जात होता. त्यावेळी या तिघांनी पंकजच्या डोक्यावर लोखंडी पाईपने हल्ला केला तसेच धारदार शस्त्रानेही त्याला भोसकले. यात पंकज जागीच ठार झाला. तर विक्रम जेधे याच्याही डोक्यावर आरोपींनी वार केले. मात्र तो रक्तबंबाळ अवस्थेत जवळच असलेल्या पोलीस ठाण्यात पळत गेला. त्याला तातडीने दवाखान्यात दाखल करण्यात आले.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पांढरकवडा पोलिसांनी घटनास्थळ गाठले. तेथून रक्ताने माखलेला लोखंडी पाईप जप्त करण्यात आला. खुनानंतर आॅटोरिक्षाने पळून जाणाऱ्या या तिघांचा ठाणेदार गुलाबराव वाघ व सहकाऱ्यांनी पाठलाग केला. अवघ्या दहा मिनिटात कोंघारा येथील पेट्रोल पंपाजवळ तिघांनाही अटक केली. घटनास्थळी बघ्यांची प्रचंड गर्दी झाली होती. काही काळ वाहतूकही विस्कळीत झाली होती.
दारव्हा तालुक्यातील रामगाव (हरू) येथील विजय भीमराव चव्हाण (२३) याचा गुरूवारी रात्री ८ वाजता गावाशेजारी मृतदेह आढळून आला होता. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठले. त्यावेळी त्याच्या मानेवर कोयत्याने वार केल्याचे लक्षात आले. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली असता गावातीलच आरोपी विजय गोबरसिंग पवार (५०) याने त्याचा खून केल्याचे पुढे आले. त्याला ताब्यात घेऊन त्याच्या घराची झडती घेतली, त्यावेळी धान्याच्या पोत्यात लपवून ठेवलेला रक्ताने माखलेला कोयता जप्त करण्यात आला. तू माझ्या पत्नीकडे वाईट नजरेने का पाहिले या कारणावरून निर्माण झालेल्या वादात हा खून झाल्याचे पुढे आले आहे.
दोघेही गुरूवारी मद्यधुंद अवस्थेत होते. त्यातच वाद होऊन विजय पवारने विजय चव्हाणच्या मानेवर कोयत्याने वार करून त्याचा खून केल्याचे पुढे आले. या प्रकरणी मृताचे वडील भीमराव किसन चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास ठाणेदार अनिलसिंह गौतम, पोलीस उपनिरीक्षक दीपक काँक्रीेटवार, कैलास लोथे, रणजीत रबडे, करीत आहे. (लोकमत चमू)

Web Title: The bloodless murder of the youth at Pandarkarda, Darwha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.