लाच घेताना मंडळ अधिकारी एसीबीच्या जाळ्यात; बहिणीच्या नावाने शेती फेरफारचा अर्ज
By सुरेंद्र राऊत | Published: August 8, 2023 07:48 PM2023-08-08T19:48:00+5:302023-08-08T19:48:15+5:30
बहिणीच्या नावाने असलेली शेती फेरफार करून देण्यासाठी मंडळ अधिकाऱ्याने तीन हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.
राळेगाव (यवतमाळ) : बहिणीच्या नावाने असलेली शेती फेरफार करून देण्यासाठी मंडळ अधिकाऱ्याने तीन हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. या प्रकरणी यवतमाळ एसीबी कार्यालयात तक्रार झाली. एसीबी पथकाने तक्रारीची पडताळणी केली. त्यानंतर मंगळवारी दुपारी मंडळ अधिकाऱ्याने एसीबी पथकाच्या समक्षच तीन हजार रुपयांची लाच स्वीकारली. यानंतर तत्काळ त्या अधिकाऱ्याला अटक करण्यात आली. शिशिर एकनाथ निनावे (३८) रा. राळेगाव असे या लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे.
निनावे राळेगाव तहसीलमध्ये मंडळ अधिकारी म्हणून कार्यरत आहे. त्याने मंगळवारी एसीबी पथकासमक्ष तक्रारदाराकडून एमएसईबी कार्यालयासमोर तीन हजार रुपये घेतले. या प्रकरणी एसीबीने दिलेल्या तक्रारीवरून राळेगाव पोलिसांत लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक उत्तम नामवाडे, अमलदार नीलेश पखाले, जयंत ब्राह्मणकर, अतुल मते, सचिन भोयर, राहुल गेडाम, राकेश सावसाकडे, सूरज मेश्राम, पोलिस उपनिरीक्षक संजय कांबळे यांनी केली.