अचानक आलेल्या पुरात मृतदेह वाहून गेला; यवतमाळ जिल्ह्यातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2020 11:40 AM2020-06-16T11:40:34+5:302020-06-16T11:41:01+5:30
चितेला अग्नी दिल्यानंतर काही वेळातच नदीचा प्रवाह अचानक वाढू लागला. पाहता पाहता नदीचे पात्र दुथडी भरून वहायला लागले व या पाण्यात चितेवरचा मृतदेहही वाहून जाऊ लागला.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ: नदीच्या पात्रात अंत्यसंस्कार सुरू असताना अचानक आलेल्या पुराने सरणावरचा मृतदेह पाहता पाहता वाहून गेल्याची घटना येथील वणी तालुक्यातील पळसोनी येथे सोमवारी संध्याकाळी घडली.
येथील रहिवासी सीताराम बापूराव बेलेकेर (५७) यांचा अपघाती निधन झाले होते. सोमवारी संध्याकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याचे ठरले. त्यानुसार गावातील निर्गुडा नदीच्या पात्रात चिता रचण्यात आली. त्यावेळी पात्रात अजिबात पाणी नव्हते, ते पूर्णपणे कोरडे होते. चितेला अग्नी दिल्यानंतर काही वेळातच नदीचा प्रवाह अचानक वाढू लागला. पाहता पाहता नदीचे पात्र दुथडी भरून वहायला लागले व या पाण्यात चितेवरचा मृतदेहही वाहून जाऊ लागला. येथे जमलेल्या नागरिकांची त्यामुळे मोठी धावपळ उडाली. हे पार्थिव शरीर शोधण्यासाठी आता शोध घेतला जात आहे.