पोलीस असल्याची बतावणी केली, 'त्याला' रात्री घरातून उचलले अन्...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2021 12:52 PM2021-11-18T12:52:31+5:302021-11-18T13:09:47+5:30
रात्री ९.३० वाजता एक पांढरी कार सुरेशच्या घरापुढे थांबली, त्यातून सहाजण उतरले. त्यांनी पोलीस असल्याचे सांगत सुरेशला झोपेतून उठवून गाडीत डांबले. तेथून ४८ तासानंतर वर्धा नदीपात्रात करकचून तोंड बांधलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला.
यवतमाळ : मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या युवकाला रात्री आलेल्या सहा जणांनी झोपेतून उठवून अंतर्वस्त्रावर गाडीत डांबले. तेथून ४८ तासानंतर त्या युवकाचा वडकी येथे वर्धा नदीत मृतदेह आढळला. ही खळबळजनक घटना कळंब तालुक्यातील तिरझडा येथे घडली. का कशासाठी कुणी हा खून केला याचा शोध घेतला जात आहे.
सुरेश श्यामराव पवार (३४) रा. तिरझडा असे अपहरण व नंतर खून झालेल्या युवकाचे नाव आहे. सुरेश हा त्याच्या पत्नीसह झोपडीवजा घरात राहत होता. सोमवारी रात्री ९.३० वाजता एक पांढरी कार त्याच्या घरापुढे थांबली. त्यातून सहा जण उतरले. त्यांनी सुरेशला झोपेतून उठवून गाडीत डांबले. पोलीस असल्याचे सांगत त्यांनी कुणाचेही ऐकले नाही. सुरेशची पत्नी शालिनी ही मदतीसाठी आरडाओरडा करीत होती. विरळ वस्ती असल्याने कुणीही पुढे आले नाही. या घटनेची तक्रार कळंब पोलिसांनी घेतली. त्या अज्ञात सहा जणांवर अपहरणासह विविध गुन्हे दाखल केले. याचा तपास ठाणेदार अजित राठोड यांच्या मार्गदर्शनात सुरू होता. मात्र मंगळवारीसुद्धा सुरेशचा थांगपत्ता लागला नाही.
बुधवारी दुपारी वडकी शिवारात वर्धा नदी पात्रात करकचून तोंड बांधलेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळून आला. वडकी पोलिसांनी वायरलेसवर याची माहिती प्रसारित केली. कळंब पोलीस घटनास्थळी पोहोचले. सुरेशच्या हातातील कडे, गोंदलेले नाव व अंगावर असलेली चड्डी यावरून त्याची ओळख पटविली.
या गुन्ह्यात अपहरणाबरोबरच खुनाची नोंद कळंब पोलिसांनी घेतली. सुरेश घरून जिवंत गेला मात्र त्याचा मृतदेहच पोलिसांच्या हाती लागला. ४८ तासात कळंब पोलिसांना सुरेशच्या अपहरणकर्त्यांचा माग काढता आला नाही. दगड फोडून, मध विक्री करून गुजराण करणाऱ्या सुरेशची अपहरण करून हत्या कोणत्या कारणासाठी झाली, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. झोपडी वजा घरात राहणारी सुरेशची पत्नी शालिनी हिचे तर भानच हरपले आहे.
गोवा, मुंबईत होता कामला
सुरेश पवार हा मध गोळा करण्याचे काम करीत होता. यासाठी तो गोवा, मुंबई या सारख्या महानगरात जात असे. तेथे मोठ्या निवासी संकुलात इमारतींना लागलेेले मधाचे पोळ काढण्याचे काम करीत होता. गेल्या काही दिवसांपासून तो गावीच होता.