बेपत्ता चालकाचा मृतदेहच सापडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 10:08 PM2018-01-18T22:08:37+5:302018-01-18T22:09:27+5:30
चार दिवसांपूर्वी नागपूरला जातो म्हणून घरुन निघून गेलेल्या युवकाचा वर्धा जिल्ह्यातील कोटेश्वर येथे नदीत मृतदेहच सापडला. ही घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : चार दिवसांपूर्वी नागपूरला जातो म्हणून घरुन निघून गेलेल्या युवकाचा वर्धा जिल्ह्यातील कोटेश्वर येथे नदीत मृतदेहच सापडला. ही घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली.
रुपेश खरवडे असे यातील मृताचे नाव आहे. तो स्थानिक शिवाजी चौक भागातील चमेडियानगर येथील रहिवासी होता. तो संदीप बये या आपल्या मामाकडे राहत होता. त्याच्याकडे टाटा-एस वाहन होते. हे वाहन तो स्वत:च चालवित होता. परंतु गेल्या काही दिवसांपासून त्यात काम निघाल्याने हे वाहन उभेच होते. तो येथीलच एका व्यक्तीकडे वाहनावर चालक म्हणून काम करीत होता. नागपुरातून नवीन वाहन घेण्याची त्याने तयारी चालविली होती. त्यासाठी सुमारे दोन लाखांची रक्कमही जमविल्याचे सांगितले जाते. सोमवारी १५ जानेवारी रोजी तो नागपूरला जातो म्हणून घरुन निघून गेला. मात्र परत आलाच नाही. मित्र व नातेवाईकांनी सर्वत्र शोधाशोध करूनही थांगपत्ता न लागल्याने अखेर मंगळवारी यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात त्याच्या हरविल्याची फिर्याद नोंदविली गेली. इकडे त्याची शोधाशोध सुरू असतानाच काही जण वर्धा जिल्ह्याच्या देवळी तालुक्यातील कोटेश्वर येथे पोहोचले. तेथे एका शेतात रुपेशचा मोबाईल सापडला. त्यानंतर शोध घेतला असता वर्धा नदीत त्याचा मृतदेह आढळून आला. मात्र मृतदेह फुगलेला नव्हता. त्यामुळेच रुपेशचा मृत्यू नेमका कसा झाला, याबाबत तर्कवितर्क लावला जात आहे. त्याच्या घातपाताची शंकाही व्यक्त केली जात आहे. देवळी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. वर्धा येथे रुपेशच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली.
‘तो’ साथीदार कोण ?
नागपूरला जाताना रुपेश सोबत कुणी तरी साथीदार होता, असे सांगितले जाते. तो साथीदार नेमका कोण? आणि रुपेशचा मृतदेह सापडूनही तो अद्याप पुढे का आला नाही, असा प्रश्न परिसरात उपस्थित केला जात आहे. रुपेशच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. देवळी पोलीस या कारणांचा शोध घेत आहे.