बोगस डॉक्टर पकडला, सूचनापत्र देऊन सोडला! रुग्णांच्या जीवाशी खेळ
By सुरेंद्र राऊत | Published: June 19, 2024 06:49 PM2024-06-19T18:49:58+5:302024-06-19T18:50:14+5:30
यवतमाळघाटंजी पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल
यवतमाळ : घाटंजी तालुक्यातील दुर्गम भागातील भांबाेरा प्राथमिक आराेग्य केंद्रातंर्गत येत असलेल्या बाेरगाव पुंजी येथे बाेगस डाॅक्टरने आपले दुकान थाटले हाेते.त्याच्यावर मंगळवारी धाड टाकून त्याला ताब्यात घेतले.काेलकाता येथून आलेल्या युवकाने डाॅक्टर बनून गरीब ग्रामीण रुग्णांवर उपचार करणे सुरू केले.त्याच्याकडे काेणाचेही लक्ष नव्हते.अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन ही कारवाई केली.त्याच्याकडून ११ हजारांची औषधे जप्त केली आहेत.घाटंजी पाेलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.ही कारवाई करण्यात संपूर्ण दिवस गेला.यानंतर आराेपी असलेल्या युवकाला पाेलिस ठाण्यात आणल्यानंतर काही तासातच सूचना पत्र देऊन साेडून देण्यात आले.
बोरगाव पुंजी येथे अनधिकृत वैद्यकीय व्यावसाय करत असलेल्या मिथुन बिस्वास याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणी भांबाेरा आराेग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी शुभम संजय वाडेवाले यांनी दिलेल्या तक्रारीवरून घाटंजी पाेलिसांनी गुन्हा दाखल केला.अनधिकृत वैद्यकीय व्यावसायिक शोधून कारवाई करण्यासाठी असलेल्या विस्तार अधिकारी अरुण खांडरे, अन्न निरीक्षक संजय माेहनसिंग राठोड, डॉ.धर्मेश चव्हाण यांच्या पथकाने बाेरगाव पुंजी येथील वाॅर्ड क्र.१ मध्ये अनधिकृत वैद्यकीय व्यवसाय करणारा मिथुन बिश्वास याच्याकडे छापा टाकला.ताे मूळ राहणारा पश्चिम बंगालचा असून, महाराष्ट्र राज्य वैद्यकीय व्यावसायिक म्हणून नोंदणी करावयाचे कागदपत्रं आढळून आलेले नाहीत.तसेच त्याच्याकडे औषध, इंजेक्शन व इतर वैद्यकीय उपचाराच्या वस्तू असा ११ हजार ६८ रुपयांचा मुद्देमाल मिळाला.
डॉक्टर म्हणून रुग्णांना सेवा द्यायची असल्यास त्यांना महाराष्ट्र सेवा अधिनियम १९६१ मधील कलम ३३(२) ३३ अ अन्वये औषध व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० चे सहवाचन १८ अ संबंधित वैद्यकीय परिषदेकडे नोंदणी करून घेणे आवश्यक आहे.त्यानुसार मिथुन बिश्वास याच्याकडे काेणतेही प्रमाणपत्र व नाेंदणी आढळली नाही.त्यामुळे कारवाई करत या बाेगस डाॅक्टरला ताब्यात घेत घाटंजी पाेलिसांच्या ताब्यात देण्यात आले. मात्र काही वेळानंतर या डाॅक्टरची लगेच सुटका करण्यात आली. कायद्यातील तरतुदीनुसार या गुन्ह्यासाठी केवळ दाेन वर्षांची शिक्षा असल्याने त्या बाेगस डाॅक्टरला सूचना पत्र देऊन साेडून दिले आहे.तसेच तपासासाठी त्याला वेळाेवेळी पाेलिस ठाण्यात बाेलाविण्यात येईल, असे घाटंजी ठाणेदार नीलेश सुरडकर यांनी ‘लाेकमत’ला सांगितले.