अमृत ज्येष्ठ नागरिक याेजनेची वाहकांनी फाडली बोगस तिकिटे
By विलास गावंडे | Published: August 23, 2024 07:26 PM2024-08-23T19:26:12+5:302024-08-23T19:28:20+5:30
‘एसटी’चा सरकारच्या तिजोरीवर डल्ला : विभागाचे उत्पन्न वाढल्याचा फुगा फुटणार
विलास गावंडे
यवतमाळ : सरकारचा उपक्रम असलेल्या एसटी महामंडळाने सरकारच्याच तिजोरीवर डल्ला मारण्याचे महाधाडस केले आहे. ७५ वर्षांवरील नागरिकांची चक्क बोगस तिकिटे फाडल्याचा प्रकार पुढे आला आहे. महामंडळाची तिजोरी भरुन वरिष्ठांव्दारे पाठ थोपटून घेण्यासाठी काही कर्मचाऱ्यांनी ही उठाठेव केली असून आता ती त्यांच्याच अंगलट येत आहे. या प्रकरणाची महामंडळाकडून चौकशी सुरु करण्यात आली असून, एका कर्मचाऱ्याला निलंबितही करण्यात आले आहे. दरम्यान, काही अधिकारीही कारवाईच्या कचाट्यात सापडणार असल्याने कर्मचाऱ्यात खळबळ उडाली आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मागील काही वर्षांपासून आर्थिक तोट्यात आहे. यामागे कोरोना, कर्मचाऱ्यांचा संप, तिकीट चोरी, सुविधांच्या अभाव त्यामुळे एसटी पासून तुटलेला प्रवासी वर्ग आदी कारणे प्रामुख्याने सांगितली जातात. त्यातच महामंडळाचे काही विभाग अचानक फायद्यात आले. हे विभाग अचानक कसे फायद्यात आले. याचा गोषवारा घेतला असता, काही विभागात वाहकांनी अमृत ज्येष्ठ नागरिकांची बोगस तिकिटे फाडल्याचे पुढे आहले. सध्या तब्बल ३६ प्रकारच्या योजनांच्या भरवशावर लालपरी धावत आहे. अलीकडेच ७५ वर्षे वयावरील नागरिकांना प्रवासात शंभर टक्के सवलत दिली आहे. महिलांना ५० टक्के सवलत आहे. याशिवाय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, कलावंत, विविध पुरस्कारप्राप्त व्यक्तींना सवलत दिली जाते. यातीलच ७५ वर्षावरील नागरिकांसाठीची शंभर टक्के प्रवास सवलतीची तिकिटे फाडून काही वाहकांनी या रेकॉर्डब्रेक व्यवसायाला हातभार लावला. अमृत ज्येष्ठ नागरिकाचे तिकीट फाडल्यास १०० टक्के रक्कम शासनाकडून मिळते. त्यामुळे उत्पन्न वाढविण्यासाठी ही बेकायदेशिर कृती करण्यात आली.
६५ प्रवासी क्षमतेच्या वाहनात दाखविली १२५ ची भरती
एसटी बसची आसन आणि उभे राहून प्रवासी वाहतुकीची क्षमता ५५ एवढी आहे. गर्दी असल्यास ६० ते ६५ पर्यंत प्रवासी वाहतूक केली जाते. मात्र, काही बसमध्ये १२५ पर्यंत प्रवासी वाहतूक केली असल्याचे दाखविण्यात आले आहे. एका-एका बसमध्ये ३० पेक्षा अधिक अमृत ज्येष्ठ नागरिकांची तिकिटे फाडण्यात आली आहेत. खराब रस्ते, बसमधील गर्दी, पावसाचे दिवस या काळातही अमृत ज्येष्ठ नागरिकांची मोठ्या संख्येने प्रवासी संख्या दाखविण्यात आल्याने शंकेची पाल चुकचुकली आणि कारवाई सुरू केली.
महिनाभरात चक्क कोटीने वाढले उत्पन्न
जून महिन्यात तोट्यात असलेल्या एसटी महामंडळातील काही विभागाचे उत्पन्न जुलै महिन्यात कोट्यवधी रुपयांनी अचानक वाढले. स्लॅक सिझनमध्ये विभागाचे उत्पन्न कोट्यवधी रुपयांनी वाढल्याने अधिकारी वर्गही चक्रावून गेला. याचा गोषवारा घेतला असता, काही विभागांमध्ये अमृत ज्येष्ठ नागरिकांची बोगस तिकिटे फाडण्यात आल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे या विभागांनी उत्पन्न वाढल्याचे दाखवून वरिष्ठांकडून नुकतीच पाठ थोपटून घेतली आहे.
वाहकावर निलंबनाची कारवाई
अमृत ज्येष्ठ नागरिक सवलतीचे जास्तीचे बोगस तिकीट काढून जास्त प्रवासी दाखविल्याचा ठपका ठेवत वाहकांवर निलंबनाची कारवाई केली जात आहे. ‘लोकमत’ला प्राप्त झालेल्या माहितीनुसार जालना विभागातील एका आगारात ही कारवाई करण्यात आली आहे. या विभागाचा जुलै महिन्याचा नफा तीन कोटी ३४ लाख रुपये आहे. कारवाईची संख्या वाढणार असल्याची माहिती आहे. उत्पन्न वाढविण्यासाठी अधिकाऱ्यांनीच अशा पद्धतीचा अवलंब करण्याच्या तोंडी सूचना दिल्या होत्या, अशी कुजबुज आहे.
जुलैमध्ये नफ्यात आलेले विभाग
जुलै महिन्यात एसटीचे राज्यातील तब्बल १८ विभाग नफ्यात आले आहेत. यामध्ये जालना ३.३४ कोटी, अकोला ३.१४ कोटी, धुळे ३.७ कोटी, परभणी २.१८ कोटी, जळगाव २.४० कोटी, बुलढाणा २.३३ कोटी. या विभागांनी उत्पन्न वाढीसाठी केलेल्या प्रयत्नांची चौकशी यानिमित्ताने होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
"अमृत जेष्ठ नागरिक सवलत योजनेची बोगस तिकिटे दिल्याप्रकरणी वाहकावर कारवाई करण्यात आली आहे. नफ्यात आलेल्या विभागाची चौकशी केली जाणार आहे. यात दोषी आढळून आलेल्यावर कारवाई केली जाईल."
- डॉ. माधव कुसेकर, व्यवस्थापकीय संचालक व उपाध्यक्ष एसटी महामंडळ.