३६ हजार हेक्टरवर बोंडअळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 09:41 PM2017-11-11T21:41:35+5:302017-11-11T21:41:45+5:30
तालुक्यातील शेतकरी अस्मानी संकटात सापडले असताना आता कपाशीवर बोंअडळीने हल्ला केल्याने अधिक चिंतेत पडले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरखेड : तालुक्यातील शेतकरी अस्मानी संकटात सापडले असताना आता कपाशीवर बोंअडळीने हल्ला केल्याने अधिक चिंतेत पडले आहे.
मागीलवर्षीपेक्षा यावर्षी मोठ्या प्रमाणात उत्त्पन्न होईल, अशी आशा बाळगून तालुक्यातील शेतकºयांनी यंदा १६ हजार हेक्टरवर कपाशीची लागवड केली. परंतु काही बियाणे कंपन्यांनी बोगस, दर्जाहिन व कमी प्रतिकार शक्ती असलेले बियाणे शेतकºयांच्या माथी मारले. त्यामुळे यावर्षी अधिकचे उत्पन्न होणे अवघड झाले आहे. त्यामुळे लागवड खर्चसुद्धा निघणार नाही, अशी परिस्थिती आह. अनेक गावांतील शेतकरी शेतात उभ्या असलेल्या कपाशीवर नांगर फिरवित आहे.
नुकसानग्रस्त शेतकºयांच्या शेतात जाऊन आमदार राजेंद्र नजरधने यांनी प्रत्यक्ष पिकाची पाहणी केली. मार्लेगाव, खरुस, विडूळ, ढाणकी आदी ठिकाणी आमदार नजरधने यांनी भाजपा जिल्हा सचिव नितीन भुतडा, कृषी अधिकारी एन के कुमरे, कृषी सहाय्यक आर. पी. येरमुलवाड, जी. के. कुलकर्णी, मुनेश्वर, जानकार, देशपांडे, नायब तहसीलदार राजेश चव्हाण यांना घेऊन कपाशीच्या पिकाची पाहणी केली.
आमदार नजरधने यांनी नागपूर येथील येत्या हिवाळी अधिवेशनात नुकसानग्रस्त कपाशीचे नमुने दाखवणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या माध्यमातून शेतकºयांना न्याय व नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन शेतकºयांना दिले आहे.
महागाव तालुक्यात २० हजार हेक्टरवरील कपाशी संकटात
महागाव : गुलाबी बोंडअळीने तालुक्यातील २० हजार हेक्टरवरील कपाशीला घेरले आहे. तालुका कृषी विभागाकडे ५०० शेतकºयांनी याबाबत अधिकृतपणे तक्रारी दिल्या आहेत. महागाव तालुका कापूस उत्पादक म्हणून ओळखला जातो. यंदा २९ हजार हेक्टरवर कपाशीची लागवड झाली. त्यापैकी तब्बल २० हजार हेक्टरमधील कपाशीवर लाल बोंडअळीने हल्ला केला आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. कपाशीच्या सुरक्षिततेसाठी तीन तालुके मिळून केवळ एकच कीड नियंत्रक आहे. हे कार्यक्षेत्र मोठे असल्याने कीड नियंत्रक कोणत्याच तालुक्याकडे फिरकल्याचे दिसत नाही. तालुक्यातील अंबोडा, वाघनाथ, खडका, चिलगव्हाण, उटी, हिवरा, करंजखेड, मुडाणा, लेवा आदी गावांतील कापूस उत्पादकांनी तक्रारी केल्यानंतर आमदार राजेंद्र नजरधने यांनी अधिकाºयांचा ताफा घेउन शेत शिवार गाठले. त्यांनी संपूर्ण पाहणी केली. त्यांनी शेती आणि शेतकºयांची स्थिती बघून नुकसानीच्या पंचनाम्याचे निर्देश दिले. तालुका कृषी अधिकारी राजकुमार रणविर आणि त्यांचा कृषी विभाग बांधावर जाऊन नुकसानीचे पंचनामे करीत आहे. मात्र बियाणे कंपन्यांचे अधिकारी, कर्मचारी यात सहभागी होताना दिसत नाही. कृषी विभागाने तयार केलेल्या अहवालावर स्वाक्षरी करायलासुद्धा ते तयार नाही. बियाणे कंपन्यांच्या या मुजोरीमुळे शेतकºयांमध्ये रोष निर्माण झाला आहे.
शेतकरी जागृत
पिकांवर रोगांचे संक्रमण आणि त्याचा शोध लावण्यासाठी अंबोडा येथील ‘अमृत’ पॅटर्नचे जनक अमृतराव देशमुख यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या सतर्कतेने तालुक्यातील शेतकरी जागृत होत आहेत. त्यांचे संशोधन विद्यापीठाच्या पुस्तकी ज्ञान असलेल्या अधिकाºयांसाठी चपराक ठरत आहे.