पुस्तक वितरण जबाबदारी केंद्रप्रमुखांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 10:36 PM2019-06-18T22:36:58+5:302019-06-18T22:37:22+5:30
दरवर्षी दोन ते तीन टप्प्यात मिळणारी शाळांची पुस्तके यंदा एकाच टप्प्यात प्राप्त झाली असून या पुस्तक वितरणाची जबाबदारी केंद्रप्रमुखांवर देण्यात आली आहे. वणी पंचायत समितीसाठी यावर्षी नव्या सत्राकरिता ८७ हजार ३१६ पुस्तके मिळाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : दरवर्षी दोन ते तीन टप्प्यात मिळणारी शाळांची पुस्तके यंदा एकाच टप्प्यात प्राप्त झाली असून या पुस्तक वितरणाची जबाबदारी केंद्रप्रमुखांवर देण्यात आली आहे. वणी पंचायत समितीसाठी यावर्षी नव्या सत्राकरिता ८७ हजार ३१६ पुस्तके मिळाली आहे. ही पुस्तके ग्रामीण भागात पोहचली असून शाळेच्या पहिल्या दिवशी त्याचे वितरण होणार आहे.
वणी पंचायत समितीअंतर्गत एकूण १३ केंद्र असून त्याअंतर्गत जिल्हा परिषदेच्या १३९ शाळा आहेत. सर्व शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठविच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके देण्याची योजना आहे. या योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेच्या १३९ शाळा तसेच वणी पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या १३ केंद्रांच्या अखत्यारित येत असलेल्या खासगी अनुदानीत शाळांना या पुस्तकांचे वितरण करण्यात येणार आहे.
वणी पंचायत समितीअंतर्गत रासा केंद्रात चार, कायर केंद्रात एक, नेरड केंद्रात दोन, चिखलगाव केंद्रात चार, राजूर केंद्रात पाच, शिंदोला केंद्रात एक, शिवणी केंद्रात एक, शिरपूर केंद्रात चार, नायगाव केंद्रात एक, भालर केंद्रात एक, सावर्ला केंद्रात दोन, वांजरी केंद्रात दोन, तर वेळाबाई केंद्रात एक, अशा एकूण २९ खासगी अनुदानीत शाळा आहेत. १३९ जिल्हा परिषद शाळांसह या २९ शाळांसाठी पुस्तके रवाना करण्यात आली असून प्रत्येक केंद्रावर एक दिवस ठरवून पुस्तकांचे वितरण केले जाणार आहे.
यापूर्वी वणी पंचायत समितीच्या बिआरसीमधून केंद्रप्रमुखांना संबंधित शाळांसाठी पुस्तके दिली जायची. परंतु केंद्रप्रमुख आपल्यावरील जबाबदारी इतर कुणावर तरी सोपवून मोकळा व्हायचा. परिणामी पुस्तके विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत नव्हती. परंतु आता पुस्तक वितरणाची संपूर्ण जबाबदारीच केंद्रप्रमुखांवर सोपविण्यात आल्याने गोंधळ उडाल्यास त्यासाठी केंद्र प्रमुखाला जबाबदार धरण्यात येणार आहे. ही पुस्तके विद्यार्थ्यांपर्यंत वेळेच्या आत पोहोचणार असल्याचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी प्रकाश नगराळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. शाळेच्या पहिल्या दिवशी म्हणजे २६ जूनला विद्यार्थ्यांच्या हाती पुस्तके पडावी, असे नियोजन करण्यात आल्याचे ते म्हणाले.
गणितासह सर्व विषयांची पुस्तके उपलब्ध
दरवर्षी दोन ते तीन टप्प्यात पुस्तके पाठविली जायची. परंतु यावर्षी पहिल्यांदाच सर्व विषयांचे पुस्तके एकाच टप्प्यात प्राप्त झाली आहे. चौथीच्या सेमी इंग्रजी माध्यमाच्या गणित विषयाचे पुस्तकदेखील एकाचवेळी उपलब्ध झाले आहे.