प्रत्येक बसस्थानकावर उभारणार पुस्तकांची दालने; लोकवाहिनी करणार मराठीचा जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 03:28 PM2018-02-23T15:28:24+5:302018-02-23T15:30:13+5:30

एसटी महामंडळातर्फे मराठी वाचन सप्ताह राबविला जाणार आहे. २७ फेब्रूवारी ते ५ मार्च या कालावधीत अनोख्या पध्दतीने मराठी भाषेचा जागर केला जाणार आहे.

Bookstores will be set up at each bus station in state | प्रत्येक बसस्थानकावर उभारणार पुस्तकांची दालने; लोकवाहिनी करणार मराठीचा जागर

प्रत्येक बसस्थानकावर उभारणार पुस्तकांची दालने; लोकवाहिनी करणार मराठीचा जागर

Next
ठळक मुद्देराज्य परिवहन मंडळातर्फे वाचन सप्ताहाचे अनोखे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : आजच्या धावपळीच्या जीवन पध्दतीत वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे. विविध माध्यमांच्या आहारी गेलेल्या नव्या पिढीला मराठी भाषेतील अभिजात लेखन संस्कृतीची ओळख व्हावी, या उद्देशाने एसटी महामंडळातर्फे मराठी वाचन सप्ताह राबविला जाणार आहे. २७ फेब्रूवारी ते ५ मार्च या कालावधीत अनोख्या पध्दतीने मराठी भाषेचा जागर केला जाणार आहे.
ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज (वि.वा. शिरवाडकर) यांचा जन्मदिन २७ फेबु्रवारी मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून प्रत्येक बसस्थानकावर वाचन सप्ताह राबविला जाणार आहे. परिवहन व खारभूमी विकासमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी ही घोषणा केली आहे. सप्ताहात बसस्थानकावर पुस्तके, ग्रंथ, काव्यसंग्रह, प्रवासवर्णन आदी मराठी भाषेतील साहित्य विक्रीची दालने उभारली जाणार आहे. विविध प्रकाशन संस्था, पुस्तक विक्री केंद्राद्वारे प्रवासी, एसटी कर्मचाऱ्याना सवलतीच्या दरात पुस्तक विक्री केली जाणार आहे. पुस्तक विक्रीसाठी या संस्थांना महामंडळातर्फे विनामूल्य मोकळी जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
महामंडळामार्फत मागील तीन वर्षांपासून नावीन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून मराठी भाष गौरव दिन साजरा केला जात आहे. यंदा मराठी वाचन सप्ताह या अनोख्या उपक्रमांच्या माध्यमातून पुस्तकाशी मैत्री करण्याची संधी उपलब्ध करून दिली जात आहे. सप्ताहाच्या निमित्ताने एसटीने दररोज प्रवास करणाऱ्या सुमारे ७० लाख लोकांना प्रवासवर्णने, विविध लोकनेत्यांचे चरित्र, कथा, कादंबऱ्या, काव्यसंग्रह, मौलिक गंथ, विविधांगी लेखन साहित्य उपलब्ध होणार आहे. मातृभाषेच्या संवर्धनासाठी मराठी भाषेतील पुस्तकांचे वाचन वाढावे, यासाठी लोकवाहिनीच्या दैवतालाही साद घातली आहे. प्रत्येक प्रवासी, कर्मचाऱ्यांनी बसस्थानकावर असलेल्या दालनावरून मराठी भाषेची पुस्तके उपलब्ध करून वाचावी, असे आवाहन महामंडळाने केले आहे.

Web Title: Bookstores will be set up at each bus station in state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.