भाजपाची ऐनवेळी बोरेलेंना हुलकावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 12:27 AM2017-11-25T00:27:05+5:302017-11-25T00:27:31+5:30
पांढरकवडा पालिका निवडणूक : समर्थकांमध्ये रोष, छावणीत शुकशुकाट, भव्य तयारीवर पाणी फेरले
नरेश मानकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पांढरकवडा : भाजपातर्फे पांढरकवडा नगरपालिका निवडणुकीत खुशी बोरेले यांना नगराध्यक्षपदाची तिकीट मिळेलच, हे जवळपास निश्चित झाले असताना व बोरेले यांच्या समर्थकांनी नामांकन दाखल करण्यासाठी भव्य तयारी केली असताना, शुक्रवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास ऐनवेळी खुशी बोरेले यांना हुलकावणी देत श्रद्धा तिवारी यांना तिकीट देण्यात आले. यामुळे बोरेले समर्थकांना चांगलाच धक्का बसला. अकस्मात घडलेल्या या घडामोडीने शुक्रवारी पांढरकवडातील राजकारण ढवळून निघाले.
१३ डिसेंबर रोजी होणाºया पांढरकवडा नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी सुरूवातीपासूनच येथील युवा उद्योजक आतिश बोरेले यांच्या पत्नी खुशी बोरेले यांचे नाव भाजपातर्फे नगराध्यक्षपदासाठी अग्रक्रमावर होते. या भागाचे खासदार तथा केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर व आमदार राजू तोडसाम यांनीदेखील अध्यक्षपदाच्या उमेदवार खुशी बोरेले याच राहतील, आपण तयार करा असे आतिश बोरेले यांना सांगितले. परंतु मध्यंतरी शिवसेनेच्या उमेदवार राधिका बोरेले यांचे पती संतोष बोरेले यांनी खुशी बोरेले यांना निवडणूक लढवू नये, यासाठी आतिश बोरेलेंची मनधरणी केली. यासाठी शिवसेनेच्या मंत्र्यांकडूनही त्यांच्यावर दबाव आला.
त्यामुळे त्यांनी १३ नोव्हेंबर रोजी आतिश बोरेले यांनी पत्रकार परिषद घेऊन कौटुुंबिक संबंध चांगले रहावे, म्हणून खुशी बोरेले या निवडणूक लढणार नाहीत, असे जाहीर केले. ही बाब ना.हंसराज अहीर व आ.राजू तोडसाम यांना कळताच, त्यांनी लगेच आतिश बोरेले यांच्याशी संपर्क साधला व भाजपातर्फे अध्यक्षपदाची निवडणूक खुशी बोरेले यांनाच लढवावी लागेल, असे सांगितले. त्यानंतर आतिश बोरेले निवडणुकीच्या तयारीला लागले.
शुक्रवारी नामांकन दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी खुशी बोरेले यांचे नामांकन दाखल करण्यासाठी आतिश बोरेले व त्यांच्या समर्थकांनी पांढरकवडातील एका मंगल कार्यालयात जय्यत तयारी केली. मिरवणुकीने नामांकन दाखल करण्यासाठी शुक्रवारी सकाळपासूनच हजारो कार्यकर्त्यांनी मंगल कार्यालय परिसरात गर्दी करायला सुरूवात केली होती.
तीन क्विंटलचा भात अन् अकोल्याचे बॅन्डपथक