जुळ्या मुली झाल्याने घराबाहेर काढले
By Admin | Published: June 13, 2014 12:31 AM2014-06-13T00:31:19+5:302014-06-13T00:31:19+5:30
स्त्री जन्माचे स्वागत करण्यासाठी राज्यभर व्यापक मोहीम राबविली जात असताना जुळ्या मुली झाल्या म्हणून चक्क एका विवाहितेला घराबाहेर काढण्यात आले. ही घटना दिग्रस तालुक्यातील रूईतलाव येथे घडली.
१४ जणांवर गुन्हा : दिग्रस तालुक्यातील घटना
दिग्रस : स्त्री जन्माचे स्वागत करण्यासाठी राज्यभर व्यापक मोहीम राबविली जात असताना जुळ्या मुली झाल्या म्हणून चक्क एका विवाहितेला घराबाहेर काढण्यात आले. ही घटना दिग्रस तालुक्यातील रूईतलाव येथे घडली. या प्रकरणी पोलिसांनी सासरच्या १४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सपना कैलास राठोड (२९) रा. रुई तलाव असे अभागी मातेचे नाव आहे. सपनाचा विवाह कैलास राठोड या तरुणासोबत झाला. सुखाचा संसार सुरू असताना या दाम्पत्याला जुळ्या मुली झाल्या आणि तेथूनच सपनाच्या छळाला प्रारंभ झाला. दोनही मुलीच झाल्याने सासरची मंडळी संतप्त झाली. आपला राग त्यांनी सपनावर काढणे सुरू केले. तिचा शारीरिक व मानसिक छळ सुरू झाला. अन्वीत छळाला कंटाळून तिने पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी महिला समेट कक्षाकडे प्रकरण पाठविले. परंतु सासरची मंडळी ऐकायला तयार नव्हती. शेवटी सपनाने दिग्रस पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून पती कैलास राठोड, संजय राठोड, ज्योती राठोड, प्रल्हाद राठोड, अश्विन राठोड, बालाजी उर्फ शाम राठोड, शांताबाई राठोड, गोलू राठोड सर्व रा. रूई तलाव, दत्ता जाधव, शोभा जाधव रा. नांदगव्हाण, श्रीचंद पवार, इंदाबाई पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आजही मुलगाच हवा ही मानसिकता कोणत्या टोकाला जाते हे या घटनेवरून दिसून येत आहे. (प्रतिनिधी)