बोटोणीतील पितापुत्र अर्धांगवायूने खाटेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 10:23 PM2018-06-02T22:23:20+5:302018-06-02T22:23:20+5:30
गेल्या आठ वर्षांपासून अर्धांगवायू आजाराच्या संकटाने येथील तोडसाम कुटुंब हैराण आहेत. पती आणि कमावता मुलगा खाटेवर पडून असल्याने वृद्ध महिलेची जगण्या आणि जगविण्यासाठी धडपड सुरू असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी या कुटुंबाची भेट घेऊन या कुटुंबाला दत्तक घेतले.
लोकमत न्यूज नेटवर्क
बोटोणी : गेल्या आठ वर्षांपासून अर्धांगवायू आजाराच्या संकटाने येथील तोडसाम कुटुंब हैराण आहेत. पती आणि कमावता मुलगा खाटेवर पडून असल्याने वृद्ध महिलेची जगण्या आणि जगविण्यासाठी धडपड सुरू असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी या कुटुंबाची भेट घेऊन या कुटुंबाला दत्तक घेतले. दरमहा पाच हजार रुपये व खाटेवर पडून असलेल्या पितापूत्राच्या संपूर्ण उपचाराची जबाबदारी त्यांनी घेतली.
बोटोणी येथील वामन रामजी तोडसाम (७०) व त्यांचा मुलगा सुहास तोडसाम (३५) हे पितापूत्र गेल्या आठ वर्षांपासून अर्धांगवायू आजाराने ग्रस्त आहेत. घरातील तरूण, कमावता मुलगा सुहास याला २०१० मध्ये अर्धांगवायू झाला, तर वडील वामन तोडसाम हे २०१६ पासून त्रस्त आहेत. घरातील कमावते आजाराने अर्धांगवायून ग्रस्त असल्याने घर सांभाळण्याची जबाबदारी आता मातेवर आली आहे. कमावता मुलगा गेल्या आठ वर्षापासून त्रस्त असल्यामुळे घरात खायला धान्यसुद्धा नाही. पती गेल्या दोन वर्षांपासून खाटेवरच असल्याने मजुरी करून रेवता तोडसाम या वृद्धेला पती व मुलाला जगवावे लागत आहे.
दरम्यान, हा प्रकार उंबरकर यांना कळताच, त्यांनी गुरूवारी बोटोणी येथे जाऊन तोडसाम कुटुंबाची भेट घेतली. त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. बिकट परिस्थिती लक्षात घेऊन या कुटुंबाच्या दरमहा खर्चासाठी त्यांनी पाच हजार रुपये व दोघांच्या उपचाराचा संपूर्ण खर्च करण्याचे त्यांनी ग्रामस्थांपुढे जाहीर केले.
तसेच पाच हजार रुपयांची रक्कमदेखील त्यांनी रेवता तोडसाम यांना रोख पाच हजार रुपयांची मदतदेखील तात्काळ दिली.