दोन्ही आमदार पवारांसोबत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2019 06:00 AM2019-11-24T06:00:00+5:302019-11-24T06:00:07+5:30
शनिवारी सकाळी झालेल्या शपथविधीने राज्याच्या राजकारणातच राजकीय भूकंप आणला. राष्ट्रवादीचे आमदार फुटल्याची वार्ता पसरताच पक्षाकडून आपल्या आमदारांची जुळवाजुळव सुरू झाली. शिवाय पक्षाचे नेमके कोण आमदार अजित पवारांसोबत आहेत, याचा शोध सुरू झाला. पक्षाकडून सुरू झालेला हा शोध यवतमाळ जिल्ह्यातही पोहोचला.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शनिवारी सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडाळी उघड झाली. कोण आमदार कुणासोबत असेल याची राज्यभर चर्चा सुरू झाली. यवतमाळ जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही आमदारांनी आपण पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत असल्याचे जाहीर केले.
शनिवारी सकाळी झालेल्या शपथविधीने राज्याच्या राजकारणातच राजकीय भूकंप आणला. राष्ट्रवादीचे आमदार फुटल्याची वार्ता पसरताच पक्षाकडून आपल्या आमदारांची जुळवाजुळव सुरू झाली. शिवाय पक्षाचे नेमके कोण आमदार अजित पवारांसोबत आहेत, याचा शोध सुरू झाला. पक्षाकडून सुरू झालेला हा शोध यवतमाळ जिल्ह्यातही पोहोचला. परंतु पुसदचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित आमदार इंद्रनील मनोहरराव नाईक तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा विधान परिषद सदस्य ख्वाजा बेग यांनी आपण पक्षासोबत आणि शरद पवारांसोबत असल्याचे सांगितले. ‘लोकमत’ने राष्ट्रवादी काँग्रेसच्या बहुतांश पदाधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या असता सर्वांची आपण पक्षासोबत व शरद पवारांसोबत असल्याचे सांगितले. समाजातील प्रतिष्ठीतांनी मात्र या शपथविधीवर बहुतेक प्रतिकूल प्रतिक्रिया नोंदविल्या. सर्व प्रमुख पदाधिकारी राष्ट्रवादी सोबत आहे.
दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याचे जाहीर होताच भाजपच्या कार्यकर्त्यांनी सर्वत्र फटाके फोडून व मिठाई वाटून जल्लोष केला. यवतमाळात दत्त चौक, जयविजय चौकात तसेच आर्णी शहरातसुद्धा भाजप कार्यकर्त्यांनी विजयाचा जल्लोष केला. यवतमाळकरांची शनिवारची झोप शपथविधीच्या वार्तेनेच उघडली. आज दिवसभर या शपथविधीची चर्चा होती. त्यावर चौकाचौकात चांगल्या-वाईट प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या. मात्र बहुतांश प्रतिक्रिया या संतप्त होत्या.
भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मुंबईला रवाना
राज्यात सत्ता स्थापनेसाठी शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस असे नवे समीकरण जुळल्यानंतर भाजपचे आमदार शांत होते. यवतमाळ जिल्ह्यात विधानसभेचे पाच व परिषदेचे एक असे सहा आमदार आहे. हे सर्व आमदार आठवडाभरापासून यवतमाळात उपस्थित होते. परंतु शनिवारी सकाळी देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री पदाचा शपथविधी पार पडताच या आमदारांना मुंबईत पाचारण करण्यात आले. सायंकाळी भाजपचे हे आमदार मुंबईला रवाना झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही आमदारसुद्धा मुंबईला रवाना झाले. जिल्ह्यात काँग्रेसचे विधानसभेचे आमदार नाहीत. डॉ. वजाहत मिर्झा हे विधान परिषदेचे सदस्य आहेत. ते या राजकीय घडामोडींमुळे आधीच मुंबईत तळ ठोकून आहेत. शिवसेनेत गेलेले काँग्रेसचे दुसरे एमएलसी हरिभाऊ राठोड हे सुद्धा मुंबईतच आहेत.